चार्वाक (Charvak)




पुस्तक - चार्वाक (Charvak)
लेखक - सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३२
प्रकाशन - साधना प्रकाशन मार्च २०२१
छापील किंमत २००/- रुपये
ISBN - 978-93-92962-21-9  

पुणे पुस्तक महोत्सवात खूप वेगवेगळ्या विषयांवरची, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळत होती. अशाच एका स्टॉलवर लक्ष गेलं या पुस्तकाकडे - "
चार्वाक"हा विषय कमी वाचनात आलेला म्हणून पुस्तक लगेच विकत घेतलं. 

चार्वाक म्हटलं की हा श्लोक आठवतो
यावज्जीवेत सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
अर्थात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मजेत जगा. कर्ज काढून तूप प्या (चैन करा). मेल्यानंतर देहाची राख होणार आहे. मग कुठला पुनर्जन्म आणि कशाची चैन?  असे चार्वाकाचे सांगणे आहे असे वाचण्यात येते. 
चार्वाक नास्तिकमत मांडणारा आहे. या देहाचे सुख, आत्ताच्या जगातलं सुख हे महत्त्वाचं आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर यांची पर्वा न करता जगायला सांगणारा अशी साधारण समाजातली समजूत आहे. तशीच माझीही आहे. तरीही भारतीय तत्त्वज्ञानातले द्वैत- अद्वैत, आस्तिक - नास्तिक, सांख्य , योग असे वेगवेगळे मतप्रवाह मांडताना चार्वाकांचं नावही नेहमी येतं. त्यामुळे या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचं अजून योगदान काय आहे; त्याचे तत्वज्ञान अजून काय आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता वाटली. पुस्तकाचा पाठ मजकूर बघितला तर त्यात असा उल्लेख आहे की "चार्वाकांचा एकही ग्रंथ सध्या संशोधकांना सापडलेला नाही. त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेषही हाती लागले नाहीत". आता मला गंमत वाटली की, काहीच उपलब्ध नसताना लेखकाने १२० पाने काय बरं मजकूर लिहिला असेल? त्याने स्वतः संशोधन करून आत्तापर्यंत न सापडलेलं काही शोधून काढलं की काय? म्हणून उत्सुकतेने पुस्तक विकत घेतलं.

पुस्तकाचं सांगणं असं आहे की... चार्वाक बुद्धीप्रामाण्य मानणारे होते. प्रत्यक्ष अनुभव, प्रमाण, अनुमान, तर्क यातून जे ज्ञान मिळतं तेच खरं. त्याहून वेगळं कोणी सांगत असेल तर त्या फक्त कल्पनाच. ईश्वर सृष्टीचा निर्माता, स्वर्ग-नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, या गोष्टी कोणीही न पाहिलेल्या प्रत्यक्ष न अनुभवलेल्या. त्या खऱ्या नाहीत. मोक्ष, ब्रह्म, आत्मा वगैरे भानगड पण काही खरी नाही. "जग खोटं आहे आणि ब्रम्ह सत्य आहे" असं मानण्यात काही हशील नाही. उलट हे जगच खरं आहे. तेच समजून घेतलं पाहिजे. या जगात सुखी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी चार्वाकांची विचारसरणी आहे. "
ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हा मूळ चार्वाकांचा श्लोक नसून त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना भोगीविलासी ठरवण्यासाठी नंतरच्या लोकांनी त्यांच्या श्लोकाचा असा विपर्यास केला आहे. 

लेखकाचं म्हणणं असं आहे की हजारो वर्ष चालत आलेली वैदिक परंपरा स्थिरस्थावर होण्याच्या आधी सुद्धा चार्वाकमत अस्तित्वात होतं. त्याला "लोकायत" मत असं म्हटलं जायचं. पण पुढे वैदिक संस्कृती असो, बौद्ध धर्म असो की जैनधर्म; प्रत्येक पंथाला आपापल्या श्रद्धा अत्यावश्यक वाटत होत्या. त्यांनी चार्वाकांना वैचारिक हद्दपार केलं. समाजाला खोट्या संकल्पनांच्या नादी लावलं. ईश्वर न मानणारे गौतम बुद्ध सुद्धा त्यांच्या शिष्यांना चार्वाकाचे ग्रंथ वाचू नका, त्याचा उपदेश ऐकू नका असा संदेश देतात. पाश्चात्य धर्मांना कदाचित चार्वाक हे नाव माहिती नसेल. पण पाश्चात्य धर्म सुद्धा - मी म्हणतो तेच सत्य; मी म्हणतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा - अशीच आज्ञा देतात
. धर्माला प्रश्न विचारणारे वैज्ञानिक, बायबल मधलं ज्ञान खोटं आहे असं सांगणारे समाजसुधारक यांना ग्रीक व रोमन लोकांनी विरोधच केला. थोडक्यात तिकडेही चार्वाकवृत्तीला वैचारिकतेतून हद्दपार करण्यात आले होते.

पूर्वीच्या काळी पाऊस, वारा, सूर्य ह्यांना देव म्हणून पूजलं जायचं मग ईश्वर या संकल्पनेचा विकास झाला. प्रतीकं  आली मूर्ती आल्या वगैरे गोष्टी मांडल्या आहेत. माणूस भीतीपोटी किंवा अजून लाभ व्हावा यासाठी स्वतःच्या कल्पनेतून प्रथा, परंपरा, पूजा तयार केला. अस्तित्वात नसणाऱ्या देवाला मागणीपत्रे पाठवण्याचा खटाटोप ह्याहून जास्त त्याला अर्थ नाही. संतमहात्म्यांचा उद्देश उदात्त असला तरी उपदेश मात्र लोकांना भोळसट बनवणारा आहे. 

पुस्तकाच्या प्रतिपादनाचा हा मूलाधार आहे. हाच मुद्दा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पैलूंनी सांगितलेला आहे. या पुस्तकात पंधरा लेख आहेत. अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकली की त्यांचे विषय कळतील.


हे पुस्तक वाचायला घेताना माझी अपेक्षा अशी होती की चार्वाकांचा काळ, आयुष्य, कार्य, विचारसरणी, त्यांची परंपरा, विचारपद्धतीचे वेगवेगळे पैलू या सगळ्याबद्दल माहिती मिळेल. पण पुस्तकाने साफ निराशा केली. वर म्हटल्याप्रमाणे चार्वाकांचे ग्रंथ उपलब्ध नाहीयेत आणि ह्या लेखकालाही त्याहून जास्त काही माहिती नाहीये. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचून माहितीत फार भर पडत नाही. चार्वाकांबद्दल माहिती नाही तर मग १२० पानं काय लिहिले हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.

लेखकाचा सगळा भर हे दाखवण्यावर आहे की आजच्या सर्व धर्मांमध्ये भरपूर दोष आहेत. धर्माधर्मांमध्ये संघर्ष चालू आहेत. धार्मिक माणसांमुळे नीती प्रस्थापित झाली आहे असं काही दिसत नाही. धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धनसत्ता हे एकत्र येऊन लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. लोकही त्यामागे इतके वेडे झाले आहेत की वेगळा विचार करणारा माणूस त्यांना नको वाटतो. थोडक्यात आजचे धर्म सर्व वाईट. त्याचा व्यत्यास म्हणून चार्वाकांची परंपरा विचारपद्धती योग्य !! हेच पुन्हा पुन्हा पटवून देण्यासाठी त्यांनी आत्ताच्या धर्मातली वैगुण्ये विशद केली आहेत. थोडक्यात चार्वाकांची उंची दाखवण्याऐवजी प्रस्थापित धर्मांचं खुजेपण दाखवले आहे.

लेखकाने मांडलेले मुद्दे अयोग्य आहेत असं नाही. पण हे मुद्दे काही नवीन नाहीत? "देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कावळू द्या" हे केशवसुतांनी शंभर दीडशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. युरोपामध्ये झालेला रेनेसांस, भारतामध्ये झालेले प्रबोधनपर्व, समाजसुधारणा आणि आजही चालू असलेल्या सुधारणा यातून प्रत्यही हे मुद्दे पुन्हापुन्हा चर्चिले जातातच. देव आहे की नाही? पुनर्जन्म म्हणावा की नाही? पूजा करावी की नाही? मंदिरे, चर्च मशिदी इत्यादींची गरज आहे का? याबद्दल सतत चर्चा चालू असते. थोडक्यात श्रद्धा का बुद्धीप्रामाण्य हा वाद कायम टिकणार आहे.

लेखकाचं म्हणणं असं आहे की वेदपूर्वकाळात "लोकायत" अर्थात चार्वाकांचे मतच प्रचलित होते. हे वाचून मला असा प्रश्न पडला की ते जर प्रचलित होते तर ईश्वर, श्रद्धा, धर्म यांची गरज माणसाला का पडली? गरज ही शोधाची जननी आहे त्याअर्थी चार्वाकांच्या मतात काय कमतरता होती ज्यामुळे माणसाला ईश्वर, पूजाअर्चना, आराधना यांची निर्मिती करावी लागली? फक्त भारतात नाही तर जगभर. ह्याबद्दल लेखक ताकदीने बोलत नाही. 

अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचं आहे हे म्हणणं १००% योग्य. पण एवढं एक वाक्य पुरेस होत नाही ना! डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. जसजशी लोकसंख्या वाढली, श्रमविभागणी झाली, लोक एकमेकांवर अवलंबून राहू लागले, व्यवहारांची व्याप्ती वाढली तेव्हा समाजाची धारणा करण्यासाठी नियम आले, कायदे आले, नीती- अनीती आली, शिक्षा आल्या, न्याय- अन्याय आला. चार्वाकमतानुसार या सगळ्याची व्यवस्था कशी लावली जाईल याची तपशीलवार मांडणी करण्याची करणे लेखकाने टाळले आहे. समाजव्यवस्था चांगली टिकण्यासाठी, हजारो प्रकारच्या स्वभाव आणि इच्छाआकांक्षा असणाऱ्या माणसांना एकत्र घेऊन समाज टिकवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल पुस्तक पूर्णपणे मौन बाळगतं. 
केवळ चार्वाकमत आधीपासून अस्तित्वात होतं म्हणून ते योग्य महान कसं म्हणणार? फारफार तर ती अप्रगत समाजाची पहिली पायरी होती इतकंच. पुढच्या पायऱ्यांवर जाताना मानवजातीचा पाय थोडा घसरत असेल म्हणून "पहिली पायरीच बरी" असा तर्क प्रतिपादित होतो. 

आज आपण आजूबाजूला बघतो की सगळ्या सुखसोयी असणारी बरीच माणसं सुद्धा मनाने समाधानी व आनंदी नसतात. काहीतरी उणीव राहिली आहे असं त्यांना वाटत असतं. अशावेळी केवळ भौतिक समाधानापेक्षा वेगळं आत्मिक समाधान त्यांना हवं असतं. या सगळ्याचा ताळमेळ चार्वाकमतात कसा घातला जातो हा कळीचा मुद्दा लेखक विचारात घेत नाही.

समाधी ध्यान आणि चार्वाक या प्रकरणात समाधी , मनाची एकाग्रता ह्या बद्दल थोडं लिहिलं आहे. इथे तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आजपर्यंत कितीतरी योगी मुनींनीसन्यास्यांनी तो घेतलेला आहे. याची उदाहरणे स्वतः लेखकाने दिली आहेत. योगमार्गाचा अवलंब करून कोणीही तो अनुभव घेऊ शकतो. इथे तरी चार्वाक आणि परंपरा यामध्ये विरोधाभास असण्याचे कारण नव्हते. हा अनुभव घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला का किंवा स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्यांनी हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला का याबद्दल लेखक काही लिहू शकला असता. पण ती निसरडी वाट आहे हे लक्षात येताच; धर्मात असे चमत्कार सांगितले आहेत, चमत्कारांवर विश्वास ठेवू नये बुद्धी वापरावी हीच कॅसेट पुन्हा सुरू होते.

फक्त एक चांगली बाब म्हणजे फक्त हिंदू धर्म किंवा भारतीय धर्म यांच्यावर टीका न करता ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्या यांची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. त्यांच्या मधले दोषही दाखवलेले आहेत.
"चार्वाक" या नावाने जरी पुस्तक असलं तरी यातला "चार्वाक" हा शब्द गाळून त्याजागी बुद्धीप्रामाण्य किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं असतं तरी या पुस्तकाच्या मजकुरामध्ये काही फरक पडला नसता.

थोडक्यात मला हे पुस्तक आत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतल्या प्रचारासारखे वाटले. जोतो उठतो आणि  दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप करतो. दुसऱ्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे बेरोजगारी आणि गरिबी कशी वाढली, प्रदूषण कसं वाढलं हे सगळं सांगतो. पण ह्यावर उपाय म्हणून मी ठोस काय करीन हे सांगत नाहीत. माझ्या उपायांचा फायदातोटा काय, त्याची किंमत किती, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता किती, त्यासाठी काय त्याग करायला लागेल हे कोणी सांगत नाही. एकदा मला निवडून द्या स्वर्ग तुमच्या समोर. तसंच हे पुस्तक इतरांच्या चुका दाखवत स्वतःची मूठ झाकलेली ठेवत, उज्ज्वल भवितव्याची आशा दाखवतं. जुन्या निवडणूक घोषणेच्या - "न जात पार न पात पार, इंदिराजी की बात पर" च्या धर्तीवर "न जात पार न पात पार, चार्वाकजी की बात पर" !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)



पुस्तक - शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)
लेखक - क्षितिज देसाई (Kshitij Desai)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - सृजनसंवाद प्रकाशन, सप्टेंबर २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-91895-55-6

मराठीतून चांगल्या विज्ञानकथा किंवा कल्पनारंजन(फँटसी) प्रकारचं लेखन इतर साहित्यप्रकारांइतकं मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे मराठीत असं लेखन दिसलं तर मी मुद्दामून वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः त्यात नवीन लेखकाचं नाव दिसलं तर ह्या लेखकाने काय वेगळे प्रयोग केले असतील ह्याची जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे क्षितिज देसाई हे मला अनोळखी नाव आणि त्याचा विज्ञानकथा संग्रह ह्याबद्दल फेसबुक पोस्ट्स बघितल्यावर पुस्तक लगेच विकत घेतले. आवडलेही. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कळले की क्षितिज च्या कथा २०११ पासून प्रकाशित होतायत. हा त्याचा दुसरा कथासंग्रह आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात नऊ कथा आहेत. भविष्यात विज्ञान - तंत्रज्ञान ह्यांच्या प्रगतीने आपल्या जगण्यात काय बदल घडतील, त्यातून काय नवीन समस्या तयार होतील, त्यावरचे उपाय पण कसे अभिनव असतील ह्याची कल्पना करणाऱ्या ह्या कथा आहेत. रहस्यभेद न करता कथांचे विषय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो

ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट - भविष्यात माणूस इतका प्रगती साधेल की परग्रहांवरही मानवी वस्ती होईल. वस्ती आली की तिचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था आली. मग आज जशा upsc - mpsc स्पर्धा परीक्षा असतात तशा तेव्हाही mpsc परीक्षा असतील. मात्र "मार्स पब्लिक सर्व्हिस कमिशन". तिची निवडप्रक्रिया सुद्धा आधुनिक. फक्त उमेदवाराची बुद्धीच नाही तर नैतिकता कशी तपासली जाईल, त्यासाठी थेट डोक्यात कसे डोकावतील ह्याची भन्नाट कल्पना.

ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड - परग्रहांवर वस्ती झाली की तिकडे समाजव्यवस्था तयार होणार. त्यापाठोपाठ नव्या व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक सुद्धा तयार होतील. कदाचित परग्रहवासी अतिरेकी सुद्धा तयार होतील. अशा अतिरेक्यांच्या अंतराळात होणाऱ्या कारवाईला विरोध करण्याची योजना कशी आखली जाते आणि त्यात यंत्रमानव कसे काम करतात याबद्दल ची कथा.

इंडेक्स पेशंट - टाईम ट्रॅव्हल / कालप्रवास अर्थात भूतकाळात परत जाण्याचे तंत्रज्ञान हा सर्व विज्ञान कथांचा एक आवडीचा विषय. या कथेत सरकारी व्यवस्थेला कळतं की एक व्यक्ती कालप्रवास करून भूतकाळात गेली आहे. पण ती व्यक्ती सरकारमान्य किंवा योग्य परवानगी घेऊन गेलेली नाही. मग ती कोण? कशासाठी? हे शोधण्यासाठी सरकारी अधिकारी पण कालप्रवास करून मागे जातात. कालप्रवास अधिक चोर-पोलीस अशी गोष्ट. तिचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित.

शीतपेटीतून जेव्हा जाग येते - अमर व्हायची इच्छा प्रत्येक माणसालाच असते. समजा तसं होता आलं तर? आपलं शरीर जपून ठेवता आलं आणि आपल्याला हवं तेव्हा भविष्यात पुन्हा जागा होत आलं तर? जाग आल्यावर नव्या काळाशी, नव्या सभोवतालाशी जोडून घ्यावे लागेल. मेंदूमध्ये नवे ज्ञान भरावे लागेल. पण आपली ओळख तर तीच राहील. एक तंत्रज्ञान कंपनी अशी सेवा लोकांना पुरवते आहे. शीतपेटीत लोकांना ठेवते. पण इथे झालं असं की कथानायक शीतपेटीतून उठला आणि त्याला देह मात्र दुसऱ्याच माणसाचा मिळाला. आता पुढे काय?

रोबोनॅप - आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. ती गरज झाली आहे. भविष्यात यंत्रमानव सुद्धा 
असेच अतिशय कॉमन होतील. प्रत्येक माणसाकडे, घरोघरी यंत्रमानव असतील; आपली काम करून देण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी. जणू आपले ते सहकारीच. तेव्हा गुन्ह्याचं प्रकारही बदलेल. आज मोबाईल चोरीला जातात तसा भविष्यात यंत्रमानव चोरीला गेला तर? आपला सहचर असणारा रोबो किडनॅप (रोबोनॅप) झाला तर?

एआय विरुद्ध विक्रांत - यंत्रमानव कॉमन होतील. सैन्यात सैनिकांच्या बरोबरीने यंत्रमानव काम करतील. मग फितूर म्हणून सुद्धा एखादा यंत्रमानवच सैन्यात घुसला तर? अगदी माणसासारखा दिसणारा वागणारा एआय वापरणारा फितूर यंत्रमानव आला तर ? त्याला ओळखायचं कसं ?

देही देवाचा वास - हातचलाखी आणि विज्ञानातले प्रयोग करून आपण चमत्कार करतो आहेत असे भासवणारा बुवा लोकांना फसवतोय. त्याचा पर्दाफाश करणारी एक तरुणी कशी करते ते वाचा.

बुद्धी विरुद्ध बळ - ह्या कथेतही पुन्हा तंत्रज्ञान वापरून दुसऱ्याची फसवणूक आणि त्याची पोलखोल आहे. पण इथे फसवणूक एक खेळाडू करतोय. कायम जिंकावं म्हणून खुबीने आणि लपूनछपून तंत्रज्ञान वापरतोय.

ह्या नऊ कथा आपल्याला आजच्या काळापासून दूर भविष्यापर्यंत, घरापासून मंगळापर्यंत, बुद्धिबळाच्या पटापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटापर्यंत, यंत्रमानवांच्या भावभावनांपासून भविष्यात जाग्या झालेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या भावनांपर्यंत सफर घडवून आणतात. आपण त्या सफरीचा समरसून आनंद घेतो. शेवटच्या दोन कथांमध्ये दाखवलेली फसवणूक कदाचित आजही घडू शकेल असं तंत्रज्ञान आसपास आहे. त्यामुळे कल्पना किती झपाट्याने सत्य होतायत ह्याची जाणीव होते. म्हणून इतर कथांमधले तंत्रज्ञान आत्ता उपलब्ध नसलं तरी या कल्पना शक्यतेच्या टप्प्यात आहेत असं आपल्याला वाटतं. त्यातून या गोष्टी अतर्क्य वाटत नाहीत. खरंच असं होऊ शकतं असा विश्वास वाचकाच्या मनात निर्माण करतात. असं झालं तर काय काय होईल याबद्दल वाचकांनाही विचार प्रवृत्त करतात.

मुख्य कल्पनेच्या गाभ्याप्रमाणेच कथांची लेखनशैलीही दृश्यात्मक आहे. कमीत कमी वर्णनात लेखक परिस्थिती आपल्यासमोर उभी करतो. अनावश्यक वर्णनाचा फापटपसारा मांडलेला नाही. निवेदन व संवाद असं दोन्ही वापरलेलं आहे त्यामुळे कथा एकसुरी होत नाही. योग्य तिथे इंग्रजी व मराठी शब्द वापरून तोही मेळ चांगला साधला आहे. प्रसंगही वेगवान घडतात आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. एक कथा वाचून झाली की लगेच पुढची वाचायची इच्छा निर्माण होते. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलंत तर नवल नाही.

काही पाने उदाहरणे दाखल
माणूस मंगळावर गेला तसा पृथ्वीवरचा भ्रष्टाचारही तिथे पोहोचला तर ?



कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा फितूर कसा शोधायचा ?



क्षितिज देसाई २०११ पासून विज्ञानकथालेखन करतो आहे. आता त्याच्या इतर गोष्टी वाचायची उत्सुकता आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा कळलं की तोही मूळचा डोंबिवलीकर आहे. माझा गाववाला! त्यातही आयटी क्षेत्रात काम करणारा. त्यामुळे कौतुक अजूनच वाढले. क्षितिजच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! क्षितिजच्या लेखनाने मराठी विज्ञानकथांचे क्षितिज कायम उजळत राहो !!



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

महानगर (Mahanagar)

पुस्तक - महानगर (Mahanagar) लेखक - मिलिंद बोकील (Milind Bokil) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४७ प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,एप्रिल २...