कोड टू झिरो (Code to zero)



पुस्तक - कोड टू झिरो (Code to zero)
लेखक - केन फोलेट (Ken Follet)
अनुवादक - प्रसाददत्त गाडगीळ (Prasaddatta Gadgil)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Code to zero (कोड टू झिरो)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
ह्या पुस्तकाची पाने - ३५०
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, जुलै २०२६
ISBN - 9789357201735
छापील किंमत - रु. ६९५/-

"कोड टू झिरो"ही एक नमुनेदार अमेरिकन रहस्यकादंबरी आहे. रशिया आणि अमेरिकेतील शीतयुद्ध, एकमेकांवर कुरघोडी करायचे प्रयत्न ह्याची पार्श्वभूमी आहे. १९५७ साली रशियाने स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडला आणि रशिया अमेरिकेच्या पुढे निघून गेला. अमेरिकाही आपल्या उपग्रह-प्रक्षेपणासाठी जोरदार प्रयत्न करू लागली. आता यश अगदी जवळ आलं आहे. दोन दिवसांत यशस्वी प्रक्षेपण होणार आहे. ते हाणून पाडण्यासाठी रशियाचे गुप्तचर जोर लावतायत. आणि तो हणून पाडण्यासाठी अमेरिकनही कंबर कसून काम करतायत. अवकाश संशोधन संस्था, गुप्तचर संस्था, सरकार दोन्ही कडे त्या त्या देशातले लोक पण शत्रू देशाचे हेर म्हणून बेमालूमपणे काम करतायत. चोरावर मोर..मोरावर चोर, सिक्रेट एजंट, डबल एजंट अशा सगळ्या गुंतागुंतीची ही कादंबरी आहे.

पाठमजकुरात म्हटलं आहे त्याप्रमाणे एका इसमाला जाग येते आणि त्याला कळते की त्याची स्मृती गेली आहे. भिकारी अवस्थेत तो एका सार्वजनिक स्वच्छतागृहात पडलेला आहे. स्वतःचं नाव, गाव, व्यवसाय हे त्याला काही काही आठवत नाही. तो ते शोधायचा प्रयत्न करू लागतो. जुनं काही आठवत नसलं तरी चालणं, बोलणं, भाषा, गाडी चालवणं आणि काही अंगभूत कौशल्य मात्र शाबूत असतात. त्या आधारे तो काही आडाखे बांधतो. पोलिसांना गाठायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या भणंग अवस्थेमुळे पोलीस त्याला मदत करायच्या ऐवजी हाकलून देतात, हाडतुड करतात. रागावलेला तो बेभान होऊन, स्वतःच्याही नकळत पोलिसावर हल्ला करतो. आडदांड पोलिसालाही लोळवतो. लीलया पिस्तूल हाताळतो. आपल्या हातून हे कसं घडलं हे त्यालाही समजत नाही. आपणही पूर्वी पोलीस होतो ? का चोर होतो ? आपल्याला हे कसं जमलं? पुढे पुढे जाताना त्याच्या लक्षात येतं की कोणीतरी सारखा त्याचा पाठलाग करतोय. त्यांनाही तो चकवा देतो. त्याला त्याचंही आश्चर्य वाटतं की आपल्या पाळतीवर कोणी आहे हे आपण कसं ओळखलं ? त्यांना गुंगारा द्यायची युक्ती डोक्यात कशी आली ? आपणही गुप्तहेर होतो का ? स्वतःच्या क्षमतांशी त्याचीच तोंडओळख होत राहते.

आपली अशी अवस्था का झाली असेल ह्याचा विचार करत, आपल्या वागण्यातून काही संकेत घेत, शंकेचं निराकरण करण्यासाठी एकेका टप्प्यावर पोलीस, वाचनालय, दवाखाना, शास्त्रज्ञ ह्यांची भेट घेत घेत स्वतःच्या अस्तित्वाबद्दल माहिती मिळवत जातो. आपली पत्नी, पूर्वीची प्रेयसी, इतर मित्र, ह्या सगळ्या लोकांचा महाविद्यालयातला ग्रुप, तेव्हाच्या घडामोडी ह्याबद्दल त्याला कळत जातं. आपले हे मित्रच आता वेगवेगळ्या पदांवर आणि वेगळगल्या संस्थांत काम करतायत. आपल्या मित्रांपैकीच कोणीतरी आपल्या ह्या अवस्थेमागे आहे ह्याची त्याला जाणीव होते.

पण हे सगळं का ? क्षेपणास्त्र उड्डाणाशी त्याचा काय संबंध? त्याच्याकडे अशी काय गोपनीय माहिती आहे ? ती माहिती विसरून जाण्यासाठी त्याच्या विरोधकांनी त्याचा स्मृतिभ्रंश घडवून आणला का? का तो रशियन हेर आहे; आणि ती माहिती तो रशियाला देणार होता म्हणून अमेरिकन CIAने त्याची ही अवस्था केली ? का रशियन गुप्त माहिती कळली कळली म्हणून रशियन KGB ने त्याची ही अवस्था केली ? ठार मारण्याऐवजी असं का केलं ? का तो एक डबल एजंट होता ? हे सगळं समजण्यासाठी ही कादंबरी वाचा.

चित्रतुकडेकोडे (जिगसॉ) सोडवल्याप्रमाणे प्रत्येक पानात एकेक माहितीचा तुकडा नायकाच्या आणि पर्यायाने वाचकाच्या हातात येतो. त्यासाठी नायकाने वापरलेली क्लृप्ती, कधी मिळालेली दैवाची साथ ह्यातून कथानक पुढे सरकते. वर्तमानात घडलेल्या घटनेचा संदर्भ सांगणारी भूतकाळातली घटना, त्यांच्या कॉलेजच्या ग्रुप मधले चौघापाच जणांचे एकमेकांशी संबंध समोर येतात. टिपिकल अमेरिकन समाजाप्रमाणे एकेका व्यक्तीचे आयुष्यात तीन चार प्रेमसंबंध, तीन चार लग्ने आणि एकाची पूर्व प्रेयसी दुसऱ्याची बायको, दुसऱ्याची पूर्व बायको एकाची आजची प्रेयसी असे सगळे साटेलोटे आहे. वैयक्तिक संबंधाचे हे जाळेसुद्धा मूळ रहस्याला अधिकच गुंतागुंतीचे करते. त्यामुळे आपला मित्र - मैत्रीण, पूर्वीची प्रेयसी हे केवळ माहिती मिळवण्यासाठी प्रेमाचे नाटक करणारे हेर तर नव्हेत ना, विश्वास ठेवायचा का नाही ? अशीही शक्यता जागोजागी येते.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अजागळ कपडे टाकून सभ्य माणसासारखे कपडे मिळवण्यासाठी चोरी करताना नायक "ल्युक"





ल्युक, त्याची मैत्रीण बिली पुढची माहिती काढण्यासाठी एका रुग्णालयात येतात तेव्हा... माहितीचा एक तुकडा, तर्क , दुसरा तुकडा ह्या प्रवासाची एक झलक.




नायक आणि प्रतिनायक कादंबरीत फार लवकर उघड झाले तरी, ते तसे का आणि ते एकमेकांवर कशी कुरघोडी करतात हे वाचण्यात आपण गुंगून जातो. पुस्तक साडे तीनशे पानी मोठ्ठं आहे. रहस्य लवकर कळावं म्हणून काही पाने टाळून पुढे गेलो तर मधल्या पानांत काय घडलं हे न कळलं नाही. नायक असा का वागतोय हे कळलं नाही. मग पुन्हा मागची पानं वाचली. असं एकदोनदा झाल्यावर लक्षात आलं की एकही पान सोडून चालणार नाही. प्रत्येक पानात एकेक सुगाव्याची खूण (clue) सापडतेय. एक खूण सोडली तरी पुढची साखळी अर्धवट राहील. त्यामुळे कधी कधी प्रसंग किंवा त्यातले वर्णन फापटपसारा आहे असे वाटले तरी त्याचा काही ना काही संदर्भ पुढे येतोच. प्रत्येक प्रसंग असा खुलवण्याच्या लेखकाच्या कौशल्याची कमाल आहे ! योगायोगाने घडणाऱ्या घटना, नायक कसाही निसटू शकतो आणि नायकाला गोळी लागत नाही; हा भाग सिनेमाप्रमाणे इथे सुद्धा आहे. तेवढं स्वीकारलं तर फार अतार्किक असं काही नाहीये.

प्रसाददत्त ह्यांनीही अनुवाद छानच केला आहे. मराठी वाक्प्रचार, वाक्यरचना ह्यांचा बाज राखत ओघवता अनुवाद केला आहे.

रहस्य कथांची आवड असेल तर निवांत वेळ काढून ह्या गुंतागुंतीत नक्की शिरा !

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

कोड टू झिरो (Code to zero)

पुस्तक - कोड टू झिरो (Code to zero) लेखक - केन फोलेट (Ken Follet) अनुवादक - प्रसाददत्त गाडगीळ (Prasaddatta Gadgil) भाषा - मराठी (Marathi) मू...