पुस्तक - The Basics of Success (द बेसिक्स ऑफ सक्सेस)
लेखक - Tim Connor (टिम कॉनर)
भाषा - English (इंग्रजी)
"द बेसिक्स ऑफ सक्सेस" हे एक शंभर पानांचं छोटेखानी पुस्तक आहे. इतर कुठल्याही स्वमदत (Slef-help) प्रकारच्या पुस्तकाप्रमाणे यातही ध्येयनिश्चिती(Goal setting), वेळेचं नियोजन, अतिआवड(passion),अपयश पचवण्याची तयारी, दीर्घोद्योग याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकारची इतर पुस्तकं वाचली असतील तर यात तुम्हाला नवीन काही वाचायला मिळणार नाही.
इतर पुस्तकांमध्ये मुद्दा समजवून देण्यासाठी प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणं दिलेली असतात, प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील घटना दिलेल्या असतात. या पुस्तकात तेही नाही. थेट मुद्द्याला हात घालणारा परिच्छेद आणि त्यामागो माग एकोळी(oneliners)ची जंत्री आहे. त्यामुळे मुद्दा पटतो पण हृदयाला भिडत नाही. म्हणूनच पुस्तक वाचून एखाद्यावर सकारात्मक परीणाम होण्याची शक्यता कमी वाटते.
पुस्तकात काही कविताही आहेत. पण त्याही यथा तथाच आहेत. त्यांचा कवी कोण -लेखकच का आणि कोणी- हे दिलेलं नाही.
हे पुस्तक एक परिपूर्ण पुस्तक न वाटता, एखाद्याने या विषयावरची बरीच पुस्तकं वाचून त्याची काढलेली टिपणं (notes) आहेत असं वाटतं.
लेखकाच्या दिलेल्या माहिती प्रमाणे तो १९७४ पासून यशस्वी वक्ता आणि ट्रेनर आहे. अशा अनुभवी व्यक्तीच्या पुस्तकाकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा मात्र हे पुस्तक पूर्ण करत नाही.
तुम्ही या विषयीची पुस्तकं वाचली असतील तर नोट्स म्हणून, एखादं खुसखुशीत वाक्य चटकन मिळावं या उद्देशाने हे पुस्तक जवळ ठेवता येईल.
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------