काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)






पुस्तक :- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbUl-kaMdAhArakaDIl kathA)
लेखक :- प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २००

"प्रतिभा रानडे" हे नाव पाकिस्तान, काश्मीर या संदर्भातल्या लेखांमध्ये वाचले होते. पण त्यांचे पुस्तक पहिल्यांदाच वाचले. लेखिकेने स्वतः अफगाणिस्तानात वास्तव्य केले होते. त्याकाळात त्यांना अफगाणिस्तान आणि अफगाणी समाजजीवन जवळून पहायला मिळाले. त्याच्याच कथा या पुस्तकात आहेत. पुस्तकाच्या छोटेखानी प्रस्तावा वाचली तरी लेखिकेची भूमिका आणि या पुस्तकात काय आहे हे लगेच कळेल.


या पुस्तकात पुढील कथा आहेत.


७० च्या दशकात कम्युनिझमचा आणि रशियाचा प्रभाव अफगाणात वाढत होता. रशियाला हवा तसा अफगाणिस्तान घडावा म्हणून रशियन तंत्रज्ञ आणि पैसा अफगाणात ओतला जात होता. रस्ते, रेल्वेमार्ग रशियाला सोयीचं सोयीचे बनवले होते. त्याला काटशह म्हणून अमेरिका आणि इतर युरोपियन देशही अफगाणला तशीच मदत करत होते. पण त्यातून विकास होतच नव्हता. अफगाणला खेळणं म्हणून वापरलं जात होतं. त्यातूनच राजसत्ता उलथवून टाकण्यात आली. आणि सुरू झाले अस्थैर्याचे राजकारण. एका नेत्याला हटवून-मारून दुसऱ्याने सत्ता काबीज करायची. जुन्या सत्ताधीशाला भांडवलशाही, भ्रष्ट, देशद्रोही ठरवून त्याच्या समर्थकांना तुरुंगात टाकायचं, ठार करायचं हा नेमच झाला. परकीय शक्तींचं राजकारण आणि अस्थीर वातावरणात आपल्याच देशात निर्वासितासारखे जीवन अफगाणांना जगायला लागत होते. बदलणाऱ्या निष्ठांमुळे माणसे दिग्मूढ झाली होती. 
या कालखंडाचं वर्णन आहे - "अन्वर सलीम", "खुणा दिसू देऊ नका" या कथांत. तर या घटनांचा परीणाम तिथल्या स्त्रियांवर कसा होत होता हे "नूर ब्यूटिपार्लर", "सरहद्द", "इन्साफ" या कथांत आहे. सत्ता येतात-जातात, स्वकीयांच्या-परकीयांच्या पण प्रत्येक बदलात सर्वात भराडली जाते ती स्त्री, कुळाचा मान म्हणून स्त्रीकडे बघितलं जातं. म्हणूनच दुसऱ्याचा सर्वात मोठा अपमान म्हणजे शत्रूस्त्रियांची विटंबना. या मान-अपमान, सामाजिक व कौटुंबिय ससेहोलपटीच्या या कथा आहेत. 

"शेवटचा माणूस" या कथेत आपण अफगाणच्या या आधिच्या इतिहासात जातो. इस्लामी आक्रमणपूर्वी अफगाणिस्थानात बौद्ध धर्म प्रचलित होता. बामियान - जेथील प्रचंड बुद्ध मूर्ती तालिबानने फोडलेली- ही याचीच साक्ष आहे. "नंदग्रहार" येथील बौद्ध मठात देखील एक नांदते तीर्थक्षेत्र होते. या तीर्थक्षेत्रावर इस्लामी वरवंटा फिरला. महंमद घोरीने आक्रमण करून मठ लुटून नेला. त्यावेळी त्या मठवासींची, मठाधिपतींची अवस्था कशी झाली असेल ? अहिंसेचे तत्वज्ञान आणि आक्रमकांची क्रूर धर्मांधता याची गाठ पडल्यावर काय झाले असेल? याचे मनोज्ञ चित्रण या कथेत आहे. 

पानिपतच्या युद्धानंतर परत जाताना अहमदशहा अब्दाली मराठी माणसे-स्त्रियांना गुलाम म्हणून घेऊन गेला होता. त्यातली एक सरदारस्त्री त्याने गुलाम म्हणून न विकता तिथल्या हिंदू सरदाराला भेट दिली होती. त्याने तिच्याशी लग्न केले. या इतिहासाची कहाणी तिचा वंशज संगतो आहे "पानिपतचे शेवटचे प्रकरण"मध्ये.

"लिहायची राहून गेलेली एक कादंबरी", "बलबीरसिंगची न लिहिलेली गोष्ट" हे दोन लेख आहेत. 
अफगाणातील गझनीच्या मुहंमदाने सोमनाथ मंदीर सतरा वेळा लुटले आणि अगणित संपत्ती घेऊन परत गेला. त्याबद्दल एक कथाबीज लेखिकेला सुचते; की वाटेतल्या लुटारू टोळ्यांपसून ही संपत्ती वाचवत, जपत नेताना कदाचित ती संपत्ती वाटेत त्याने लपवूनही ठेवली असेल. ती संपत्ती खूप वर्षांनी सध्याच्या काळात मिळते. या कथाबीजावर काम करताना इतिहासचे अनवट पैलू हाती लागतात. वेगळ्या वेगळ्या अंगांनी विचार होतो. त्याबद्दलचा "लिहायची राहून गेलेली एक कादंबरी" लेख आहे. 

बलबीरसिंग नावाचे भारतीय हॉकी प्रशिक्षक अफगाणी खेळाडूंना तयार करण्यासाठी भारतातर्फे गेले होते. ते व त्यांच्या टीमवर मुजाहिदीन लोकांनी हल्ला करून सर्वांना ठार मारले. घटनेची फार वाच्यता होऊ नये म्हणून अफगाण आणि भारत सरकारही ही घटना नाकारत राहिले. बलबीरसिंग बेपत्ता आहेत असे सांगत राहिले. हे सगळं बघून बलबीरसिंगांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार लेखिका करू लागते. बलबीरसिंगाचे कल्पनाचित्र मनात येताना या भावना फक्त त्यांच्याच नाहीत तर नोकरीधंद्यासाठी अफगाणिस्तानात; परक्या जमिनीवर राहणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्याच आहेत हा अस्वस्थ करणारा विचार लेखिकेच्या मनात चमकून जातो.

या सगळ्या गोष्टी रसाळ आहेत. पूर्णपणे काल्पनिक नसल्यामुळे या गोष्टी इतिहासातल्या, समाजातल्या, आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या, मुसलमानी रिवाजांच्या वेगवेगळ्या कंगोरेही दाखवतात. उदा. अफगाणात रेल्वेसाठी विविध देश मदत करत असतात पण प्रत्यक्षात या ना त्या कारणमुळे काम पुढे जातच नसतं. तेव्हा एक परदेशी व्यक्ती म्हणते "तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची इच्छा असलेल्या तुमच्या मित्रांना-इराणला, पाकिस्तानला आणि रशियालाही ही रेल्वे नकोय. तुमच्या सरकारलाही नकोय. त्यांना वाटतं या दुष्ट रेल्वेमुळे तुमचा हा निरागस भोळाभाबडा देश बाहेरच्या जगाच्या सान्निध्यात येईल आणि बिघडेल. नकोच ती रेल्वे".
रमजानच्या महिन्यात रोजे पाळतात म्हणून ऑफिसेस लवकर सुटतात. पण दिवसभरही कोणी फार काम करत नाही असा अनुभव एका परदेशी तंत्रज्ञाला येतो. तेव्हा तो एका माणसाला वैतागून विचारतो की "सकाळी ऑफिस सुरु  झाल्या झाल्या आलो तरी सगळी माणसे मरगळलेलीच. इतक्या सकाळी तर तुमचा उपाशीपणा सुरूही झालेला नसतो न". तेव्हा तो अफगाणी म्हणतो, "खरं सांगू का, प्रत्यक्ष उपासमारीपेक्षाही आमच्या मनावर त्या उपासाचं मानसिक दडपण फार येतं.."

आज अफगाण म्हणजे एक उद्ध्वस्त देश आहे पण त्याकाळी काबुल युनिव्हर्सिटी होती, तरुण मुले शिकायला परदेशात जात होती, काबुलचा बाजार अमेरिकन, रशियन, फ्रेंच मालाने भरलेला होता; अफगाण स्त्रियाही सध्याच्या तुलनेत फारच मॉडर्न आणि मोकळ्या राहत होत्या, उंची कपडे, सौंदर्यप्रसाधने वापरत होत्या. देश इस्लामिकच होता पण आजच्या सारखा मूलतत्त्ववादी नव्हता. हे वाचून राजकारणाने एका देशाची कशी वाट लावली आहे हे तथ्य अस्वस्थ करते.

मराठे ज्याच्याशी पानिपतचे युद्ध लढले तो अहमदशहा हा अफगणचा राष्ट्रपुरुष आहे. त्याचा उल्लेख आदराने "अहमदशहाबाबा" असा केला जातो.

महंमद धोरी, गझनीचा मुहंमद यांच्या स्वाऱ्या आणि त्यांनी केलेला विध्वंस याबद्दल वाचताना आजच्या "आयसिस"ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इस्लामी धर्मांधता, दुसऱ्या धर्मियांचा नाश करण्याची शिकवण पालणारे मूलतत्ववादी आजही सक्रिय आहेत, तितकीच शक्तिशाली आहेत आणि त्याचा धोका आजही सहिष्णू-शंतताप्रेमी-अहिंसावादी भारतावर आहे हे भीषण वास्तव अधोरेखित होते.







------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...