Revolution 2020 (रिव्हॉल्यूशन २०२० )





पुस्तक : Revolution 2020 ( रिव्हॉल्यूशन २०२० )
लेखक : Chetan Bhagat (चेतन भगत)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २९०
ISBN : 978-81-291-1880-6


लोकप्रिय आणि विक्रमी खपांची इंग्रजी पुस्तकं लिहिणारे तरूण भारतीय लेखक चेतन भगत यांचे हे मी वाचलेलं तिसरं पुस्तक. 

भारतातल्या शिक्षणव्यवस्थेचा बाजार आपल्या सर्वांनाच माहितीचा आहे. विद्यार्थी, पालक किंवा शिक्षक अशा एखाद्या भूमिकेतून आपण ते जहाल वास्तव अनुभवलंही असेल. हेच बाजारूकरण या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. एका गरीब घरातला एक तरूण गोपाल बारावी नंतर जेईई-आयट्रिपलई (JEE/IEEE) प्रवेश परीक्षा द्यायचा प्र्यत्न करतो आणि त्यात नापास होतो. मग तो परीक्षांची तयारी करायला राजस्थानातल्या कोटाला जातो. तिथे तर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी करणाऱ्या क्लासमधे अ‍ॅडमिशन्साठीही पुन्हा मारामारी आणि प्रवेश परीक्षा! तिथूनही अयशस्वी होऊन पुन्हा घरी परत येतो. आणि त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळते. एका राजकारण्याची-आमदाराची नजर त्याच्यावर पडते आणि त्याच्या नावावर जमीन आहे हे बघून त्याला आपल्या जाळ्यात ओढतो. आणि कॉलेजात जाऊ न शकलेला हा तरूण कॉलेज काढतो ! शेतजमीनीची-एन ए करणे, हव्या तश्या बांधकामाला परवानगी मिळवणे, सोयी असो नसो पण विद्यापिठाची परवानगी मिळवणे अश्या बारा भानगडी आमदार, त्याचे पित्ते आणि गोपाल करतात. हळूहळू गोपाल मोठा शिक्षणसम्राट होतो. 

या "प्रगती" च्या जोडीजोडीने चालते त्याची प्रेमकहाणी - प्रेमाचा त्रिकोण. त्याची मैत्रिण -आरती - कधी गोपालशी जवळीक तर कधी त्याचा मित्र राघवशी जवळीक अशा द्वंद्वात असते. राघव इंजिनिअर होऊन स्वतःची आवड म्हणून पत्रकार झालेला असतो. एक प्रामाणिक, सत्याचा पाठपुरावा करणारा तरूण रक्ताचा पत्रकार. आपण अयशस्वी म्हणून म्हणून आरती आपल्याशी लग्नाला तयार होत नाही असं गोपालला वाटत असतं. आरतीही नेहमी "कन्फ्यूज्ड".  गोपाल मनाने प्रामणिक आहे पण आपण श्रीमंत नव्हतो म्हणून आरती आपल्याला मिळत नाही असं एकीकडे वाटत असतं म्हणुन श्रीमंत होण्याची त्याची धडपडह आहे तर दुसरीकडे गैरमार्गाने पैसा मिळवतोय याची टोचणीही आहे. 

गोपाल श्रीमांत कसा होतो; श्रीमंत झाल्यावर तरी आरती त्याला हो म्हणते का; "शिक्षणसम्राट" गोपाल आणि "प्रामाणिक पत्रकार" राघव यांच्या मैत्रीत काय उतार-चढाव येतात हे मी सांगून रहस्यभेद करत नाही.

शिक्षणाच्या बाजारूपणबद्दल, राजकारणी-बिल्डर-प्रशासन-शिक्षणसम्राट यांच्या साट्यालोट्याबद्दल आपण नेहमीच बातम्यांत ऐकतो. साधारण तेच प्रसंग ढोबळमानाने आपल्याला कादंबरीत दिसतात. सध्या बातम्याच इतक्या नाट्यमय असतात की त्यामुळे कादंबरीत काही नाट्यमय वेगळं वाटत नाही. प्रेमकथाही फार गोंधळलेली वाटते. हे "गोपालचं" स्वगत आहे त्यामुळे इतर कुठल्या पात्राच्या डोक्यात काय चालू आहे, काय भावभावना आहेत हे दिसत नाहीत. 

चेतन भगतच्या "टू स्टेट्स" आणि "हाफ गर्लफ्रेंड" खूपच मनोरंजक, चटपटीत संवाद असणऱ्या होत्या. खिळवून ठेवायच्या. ही कादंबरी वाचताना कंटाळा येत नाही पण खूप मजाही येत नाही. शेवट थोडा अनपेक्षित आहे इतकंच.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...