पुस्तक : रेषाटन (reshatan)
लेखक : शि.द.फडणीस (S.D. Phadnis)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९५
ISBN : 978-81-7925-291-8
शि.द. फडणीस हे मराठी कलारसिकांना अतिशय परिचयाचं नाव. तुम्हालाही ते नक्कीच ठाऊक असेल. पण समजा आत्ता नाव नसेल लक्षात येत तरी त्यांची चित्रं मात्र तुम्ही नक्कीच पाहिली असणार. कदाचित त्या चित्राखालची चित्रकाराची सही तुमच्या बघण्यातून सुटली असेल म्हणून नाव लक्षात येत नसेल. पण ही काही व्यंगचित्रं, हास्यचित्रं बघा.
आता तुम्ही नक्की म्हणाल या शैलितली हास्यचित्रं बघितली आहेत. पुस्तकांच्या किंवा मासिकांच्या मुखपृष्ठावर, त्यांच्या अंतर्गत सजावटीत तर कधी चक्क शाळेच्या गणिताच्या पुस्तकात. शब्दांवाचून संवाद साधणारी, खुदकन् हसायला लावणारी ही निर्विष विनोदी चित्रे आहेत शि.द. फडणीस यांनी काढलेली. "रेषाटन" हे त्यांचं आत्मचरित्र आहे.
या आत्मचरित्रात त्यांच्या जन्मापासून २००९-१० पर्यंतचं पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील एक लहान गावात बालपण, कोल्हापूरला प्राथमिक शिक्षण आणि चित्रकलेची आवड असल्यामुळे जे.जे.त शिक्षण झालं. पुढे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून उमेदवारीच्या काळात हंस मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यांचं आयुष्य बदललं. अंतरकरांनी शि.दंमधला व्यंगचित्रकार पारखला आणि शि.दंना गंभीर्याने याकडे बघायला सांगितलं. अंतरकरांनी थेट दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर व्यंगचित्र देण्याचा धाडसी प्रयोग केला. तोही १९५२ साली. लोकांना हा प्रयोग खूप आवडला. आणि व्यंगचित्रकार म्हणून शिदंचा प्रवास जोरात सुरू झाला. मुखपृष्ठे, पुस्तकांच्या आतली चित्रे, माहितीपत्रके, सेल्स मटेरियल इ. साठी हास्यचित्रांची कामं ते करू लागले. गंभीर विषयांच्या पुस्तकातला रुक्षपणा कमी करण्यासाठी त्यांना चित्र काढायला मिळाली; तर गणितासारख्या अमूर्त विषयही लहान मुलांना रंजक वाटावा अशी चित्र पाठ्यपुस्तकासाठी काढायची संधीही मिळाली. त्यांनी सरकारी कामंही केली. गंमत म्हणजे, सरकारी नियमानुसार सरकारी
दस्तऐवजांमध्ये चित्रकाराचे नाव देत येत नाही. म्हणून चित्राखालची सही त्यांना काढायला लागली !! प्रत्येक कामाच अवाका निराळा, गरजा निराळ्या आणि त्या अनुषंगाने भेटणारी माणसं निराळी. शिदंनी हे वेगवेगळे अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत. गणिताची पुस्तक करतानाचा अनुभव वाचून बघा.
(टीप : अधोरेषा माझ्या नाहीत. हे आधीच्या वाचकाचे व्यंग)
वर तुम्ही बघितलेली चित्रं बऱ्याच वर्षांपूर्वी काढलेली आहेत. पण आजही ती तितकीच ताजीतवानी आहेत. पुन्हा पुन्हा बघितली की पुन्हा पुन्हा हसू येतं. या अनुभवातूनच काही वर्षांपूर्वी शि.दंना या हास्यचित्रांचं प्रदर्शन भरवण्याच आग्रह होऊ लागला. त्यातून जन्माला आलं "हसरी गॅलरी" हे प्रदर्शन. हे प्रदर्शन कसं सुरू झालं, प्रदर्शनासाठी लागणारं साहित्य कसं त्यांनीच बनवलं, प्रदर्शनाला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि इतकं होऊनही आतबट्ट्याचा ठरलेला व्यवहार याच्याही आठवणी पुस्तकात सविस्तर दिल्या आहेत. कलावंत आणि संयोजक अशा दुहेरी भूमिकेतून आनंद आणि त्रास दोन्ही त्यांना अनुभवायला मिळालं. नवीन शहरात जाताना चित्रांच्या पेट्या "माल" या सदरात मोडत असल्याने प्रत्येकवेळी जकातीसाठी काय नखरे केले गेले याचे विचित्र अनुभव पण त्यांनी सांगितले आहेत.
व्यंगचित्रं हे माध्यमच का निवडलं? हे माध्यम इतर चित्रकला शाखांपेक्षा गौण आहे का? तुम्ही राजकीय व्यंगचित्रे का काढत नाही? चित्र निर्मितीचा प्रवास कसा असतो? चित्र सुचतं कसं? तुमच्य चित्रातल्या माणसांचे चेहेरे का बदलले नाहीत ? या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्त्तरं दिली आहेत. पुस्तकाच्या ओघात त्यांनी त्यांच्या चित्रांची चाचेगिरी (पायरसी) आणि ती रोखण्यासाठी कॉपिराईटचा व मनधनाचा त्यांनी धरलेला हट्ट, दृश्य कलेच्या प्रकारांकडे बघायची पद्धत, कलेत होणारे बदल अशा तांत्रिक बाबींवरही भाष्य केलं आहे. उदा.
(मोठे करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)
जुन्या पिढीतले, ज्येष्ठ कलाकार असूनही त्यांन नवीन तंत्रज्ञानाबद्दल, संगणकावरच्या चित्रकलेबद्दल भीति, आकस, अनादर मुळीच नाहि उलट त्याचं कौतुक आहे आणि त्याच्या चांगल्या बजू त्यांना आवडतात. उदा. ते म्हणतात.
पुस्तकाचा काही भाग वैयक्तिक डायरीसारखा अहे. त्यात त्यांचे परदेशी प्रवास आणि त्यांच्या परिवाराबद्दल त्यांनी लिहिलं आहे.
पुस्तकात नवे-जुने फोटो आणि व्यंगचित्रं भरपूर आहेत. काही चित्रांच्या जन्मकथा सांगितल्या आहेत. डायरी सदृश प्रकरणे सोडली तर सगळं पुस्तक रोचक, माहितीपर आहे. माझ्या सारखे जे चित्रकला प्रांतात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काम करत नाहीत त्यांना हा व्यवसाय कसा चालतो याची एक झलक पहायला मिळेल. चित्रकार कसा विचार करतो हे त्याच्याच शब्दात वाचायला मिळेल. पुस्तक म्हणजे त्यांची प्रदीर्घ मुलाखतच आहे. असं वाटतं की त्यांनी अजून एक पुस्तक लिहावं ज्यात खूप चित्र आणि प्रत्येक चित्राची जन्मकथा सांगावी. कार्ण पुस्तक वाचताना वाटायला लागलं कि "चित्रस्य कथा रम्या".
https://www.facebook.com/S-D-Phadnis-1411068472494727/
http://www.sdphadnis.com/
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------