Theory Of Everything (थिअरी ऑफ एव्हरीथिंग)



माझा मित्र अमर पाठक याने लिहिलेले परीक्षण, त्याच्या सौजन्याने आणि परवानगीने
पुस्तक : Theory Of Everything (थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
लेखक : Stephen Hawking (स्टीफन हॉकिंग)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : १३२
ISBN : 978-81-7992-793-9
मला documentaries पाहायला आवडतात. त्या दिवशी सहजच netflix वरती How universe works नावाची सुंदर documentary पाहत होतो. विश्व कसे चालते, आपली आकाशगंगा, आपली सूर्यमाला , तिच्यातील ग्रह , व आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, पृथ्वीवर जीवन तयार होण्यास कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या याची अत्यंत सुंदर माहिती त्यांनी या documentary मध्ये दिलेली आहे. ते पाहत असतानाच मला एकूण विश्वाच्या रचनेविषयी, कृष्णविवरांविषयी अजून जास्त जाणून घेण्याची जिज्ञासा वाढली त्यातूनच जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन व्हॉकिंग यांचे Theory Of Everything हे पुस्तक वाचण्यास घेतले..
हे पुस्तक एखाद्या कादंबरी प्रमाणे नाहीये, किंवा ते एखाद्या बोजड वाटेल अश्या वैज्ञानिक शोधनिबंधासारखेही नाहीये. ते त्यांनी दिलेल्या विविध व्याख्यानांवरती आधारित असे आहे.
त्यातील भाषा ही इतकी सहज, सोपी आहे की कुणीही सामान्य व्यक्ती ती चटकन समजू शकेल. विश्वाच्या, विज्ञानाच्या अनेक गूढ, किचकट अश्या संकल्पनांची इतकी सोप्या शब्दांत मांडणी मी प्रथमच पाहिली. हॉकिंग यांनी विश्वाच्या रचनेची माहिती देण्यासाठी कित्येक घरगुती उदाहरणांची मदत घेतली आहे त्यामुळे त्या संकल्पना आत्मसात करायला अजूनच सोपे जाते.

या पुस्तकात हॉकिंग यांनी प्रथम विश्वाची उकल करण्यासाठी इतिहासात ऍरीस्टोटल, न्यूटन अश्या तत्ववेत्यांनी आणि शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याची माहिती सांगितली आहे आणि प्रत्येकाच्या प्रयत्नातून आजचे विज्ञान कसे उभे राहिले आहे याची माहिती देऊन त्या शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


कृष्ण विवरांची निर्मिती कशी होते हे सांगताना हॉकिंग यांनी भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा गौरव केला आहे. चंद्रशेखर यांनीच प्रथम कृष्ण विवरांच्या निर्मितीसाठी ताऱ्याचा आकार कमीत कमी किती मोठा असावा लागेल याचे एक परिमाण शोधून काढले ज्याला ‘Chandrashekhar limit’ असे म्हणतात. या मर्यादा परिमानानुसार ताऱ्याचे रूपांतर कृष्ण विवरामध्ये होण्यासाठी तो तारा किमान सूर्याच्या दीडपट मोठा एवढ्या आकाराचा तरी असावा लागेल. जेव्हा हा तारा त्याच्यातील हैड्रोजनचा साठा संपत गेल्यावर जेंव्हा तो विझत जाऊन मृत होईल तेंव्हा त्याच्यातील प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याचा आकार छोटा होत होत व वस्तुमानाची घनता वाढत जाऊन तो तारा फक्त काहीशे मैल एवढ्याच आकाराचा उरतो आणि आजूबाजूच्या इतर ग्रहांना आकर्षून घेत गिळंकृत करायला लागतो. कृष्ण विवरात पदार्थाची घनता इतकी प्रचंड प्रमाणात असते की उदाहरणार्थ हिमालय पर्वत सुद्धा एका काडेपेटीत बसू शकेल इतका छोटा होऊ शकतो. हे अकल्पनिय आणि अदभुत असेच म्हणावे लागेल.


सोळाव्या शतकापूर्वी विज्ञान म्हणजे तत्त्ववेत्यांचेच कार्यक्षेत्र होते पण नंतर जेंव्हा गणित आणि शास्त्रीय संकल्पना अत्यंत विकसित आणि गुंतागुंतीच्या होत गेल्या तेंव्हापासून विज्ञानाचे क्षेत्र Science Specialist लोकांचे म्हणजेच शास्त्रज्ञांचे होऊन गेले आणि वेगाने नवनवीन माहिती समोर येत गेली.
पुढे त्यांनी विश्वाची निर्मीती कशी झाली असू शकेल याची विस्तृत माहिती देताना आजपर्यंतचे जे वेगवेगळे Big Bang सारखे models तयार केले गेले त्याविषयी सांगितलेले आहे व प्रतिप्रश्न विचारून त्याची उत्तमपणे चिकित्साही केली आहे व त्या त्या models च्या मर्यादाही स्पष्ट केल्या आहेत.
विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलताना त्यांनी सांगितले आहे की जो Big Bang (महाविस्फोट) झाला आणि त्यातून जी प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन विश्व निर्मितीची सुरुवात झाली आणि अब्जावधी तारे आणि त्याभोवती फिरणारे ग्रह असे असणाऱ्या अनेक आकाशगंगा निर्माण होत गेल्या. त्या एकमेकांपासून दूर होत गेल्या व त्या आजही एकमेकांपासून दूर दूर जात आहेत.
आपली सूर्यमाला ज्या MilkyWay नावाच्या आकाश गंगेत आहे, त्या आकाशगंगेत साधारण 200 अब्ज तारे आहेत आणि त्या ताऱ्यांभोवती फिरणारे कित्येक पटीने अधिक ग्रह आणि त्यांचे उपग्रह आहेत. आणि विश्वामध्ये अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. हे आकडे पाहिल्यास सहज लक्षात येऊ शकेल की विश्व किती प्रचंड आहे.
इतक्या अतिप्रचंड विश्वाला आपण जर एखाद्या मोठ्या कॅनव्हासवर रेखाटायचे म्हटले तर पृथ्वी कुठंतरी एक छोटासा ठिपका म्हणून असेल. तर मग त्याठिकाणी आपल्याच धुंदीत जग जिंकल्याच्या अविर्भावात मश्गुल सामान्य मानवांची काय कथा.
Big Bang विषयी सांगताना हॉकिंग यांनी Big Bang होण्यापूर्वी विश्वाची अवस्था काय असू शकेल याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये, का big bang पूर्वीही आत्ता आहे तसेच विश्व होते का की जे आकुंचन पावुन एका ठिकाणी प्रचंड घनतेने जमा झाले होते? इतकी घनता ही प्रचंड गुरुत्वाकर्षनामुळे तयार होते त्या स्थितीला विलक्षण तत्व (singularity principle) म्हणतात. विश्व हे भौतिकशास्त्राच्या नियमाने चालते परंतु अश्या विलक्षण तत्वाच्या ठिकाणी भौतिक शास्त्राचे कुठलेही नियम लागू होत नाहीत त्यामुळे त्या पूर्वी काय होते हे सध्यातरी विज्ञानाला नेमके सांगता येत नाहीये.
समजा big bang हीच विश्व निर्मितीसाठीची प्रथमावस्था असेल तर मग त्याला ऊर्जा पुरवण्याचे किंवा ते निर्माण करण्याचे कार्य कोणी केले असेल ? का तो दैवी शक्ती चा अविष्कार असू शकेल ? असे असेल तर मग खरच परमेश्वर आहे का ? अशा गोष्टींची उत्तम चिकित्सा हॉकिंग यांनी या पुस्तकात केली आहे.
हॉकिंग यांनी या पुस्तकात कृष्ण विवरांविषयी विस्तृतपणे माहिती दिली आहे. कृष्ण विवरांची निर्मिती कशी होते, त्यांच्यामध्ये किती प्रचंड प्रमाणात गुरुत्वाकर्षण शक्ती असते की जिच्या तावडीतुन प्रकाशकिरणेही सुटू शकत नाहीत.
हॉकिंग यांनी पुढे time traveling (भूतकाळात मागे जाता येणे) च्या शक्याशक्यतेविषयीही सांगितले आहे त्यामध्ये ते विविध भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांचा आधार घेत म्हणतात की , जसे विश्व आकाराने मोठे मोठे होत जात आहे परंतु जेंव्हा त्याच्या विस्ताराला मर्यादा येतील आणि प्रतिकारशक्ती (Repulsion Forces) च्या तुलनेत गुरुत्वीय शक्ती मोठी होईल मग तेंव्हा या विस्तारलेल्या आकाशगंगांचा परतीचा प्रवास सुरु होऊन त्या सर्व परत एकत्र गोळा होऊ शकतील का? आणि मग परत एकदा बिग बँग पूर्वीच्या अवस्थेत विश्व येऊन थांबेल का ? सध्या आकाशगंगा ज्या दिशेने जात आहेत ती काळाची समोरची (forward) दिशा आहे तर मग जेंव्हा त्या परत उलट्या (backward) दिशेने यायला लागतील तेंव्हा जसे आपण एखादा विडिओ ज्यामध्ये समजा टेबळावरून चहाचा कप खाली पडला आहे तो जर बॅकवर्ड केला तर जसं तो चहा परत त्या कपमध्ये येऊन बसतो तर मग तश्याच पद्धतीने विश्वातील आणि पृथ्वीवरील घटना, आयुष्ये परत बॅकवर्ड दिशेने घडतील का ? मग आधी मृत्यू व नंतर जन्म असे काही घडणे शक्य आहे का? याची उत्तरं हॉकिंग यांनी अत्यंत रंजकपणे व विज्ञानाधारीत पद्धतीने दिलेली आहेत व ती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचावे.
एवढ्या अतिप्रचंड विश्वामध्ये पृथ्वीचे स्थान नगण्य म्हणावे असेच आहे आणि पृथ्वीच्या निर्मिती पासून पृथ्वीवर मोठ मोठ्या उलकेच्या रूपांत अनेक आघात होत गेले आहेत व ते होत राहणार आहेत मग अशा परिस्थितीत इथली सजीवसृष्टी किती काळ तग धरू शकेल? मग अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी मानवाने अवकाशात नवनवीन ठिकाणे शोधून वसाहत निर्मिती करण्याचेही त्यांनी समर्थन आणि आवश्यकताही व्यक्त केली आहे.
इतक्या अफाट विश्वात मग काय फक्त पृथ्वी वरच सजीव आहेत का? कदाचित हो , कदाचित नाही. त्याचा शोध अजूनही चालूच आहे आणि त्यासाठीच केप्लर नावाचा space टेलिस्कोप इतर ग्रह ताऱ्यांजवळ जाऊन अजून कुठे सजीवसृष्टी सापडते का याचा शोध घेत आहे. आणि असा शोध घेत राहणे याचीही आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
पुस्तकाचे नाव Theory Of Everything असे आहे कारण याच्यामध्ये हॉकिंग यांनी जे विविध भौतिक शास्त्राचे सिद्धांत आहेत आणि जे सुट्या सुट्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांची एकत्रित सांगड घालून विश्वनिर्मितीचे कोडे उलगडता येईल का याचा उत्तम उहापोह केला आहे. असे करणे हे किती अवघड आहे परंतु ते जर शक्य झाल्यास आपण किती मोठे यश मिळवू शकतो यासाठीचे संदर्भ ही त्यांनी विस्तृतपणे या पुस्तकात दिलेले आहेत व ही सर्व माहिती त्यांनी अत्यंत रंजकतेने दिली आहे.
प्रत्येकाने आणि विशेषतः विज्ञानात रुची असलेल्या सर्वांनी या पुस्तकाचे जरूर वाचन करावे. याच्या वाचनाने आपल्या ज्ञानात मोलाची भर पडून कल्पनेच्या कक्षा रुंदवण्यास मोठी मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...