સંબંધ... તો આકાશ !(Sambandh ...to aakash!)





पुस्तक : સંબંધ... તો આકાશ (संबंध... तो आकाश / Sambandh...to aakash!)

लेखिका : કાજલ ઓઝા વૈદ્ય (काजल ओझा वैद्य / Kaajal Oza Vaidya)
भाषा : गुजराथी
पाने : १२८
ISBN : 978-81-8440-361-9


काजल ओझा यांचा हा कथा संग्रह आहे. प्रस्तावनेत त्या म्हणतात त्याप्रमाणे या कथा स्त्री-पुरूष संबंधावर आधारित आहेत. पण या संबंधातल्या नवरा-बायकोचं संबंध हाच सगळ्या कथांचा मुख्य गाभा आहे. या संबंधात शारिरिक गरजा, मानसिक गरजा, करियरच्या गरजा अशा वेगवेगळ्या गरजा सांभाळताना त्यांचा गेलेला तोल आणि त्यातून फसलेले लग्न संबंध असे एकूण स्वरूप आहे. काही कथा लग्नाधीचे फसलेले प्रेमप्रकरण लग्नानंतर पुन्हा आयुष्यात येते या प्रकारच्या आहेत.



उदा. काही कथांची मध्यवर्ती कल्पना :

नवर्‍याच्या मित्राबरोबर संबंध जे मुलाला कळतात...
लग्नानंतरही जुन्या प्रेयसीबरोबर चालू ठेवलेला समांतर संसार मुलीला कळतो...
स्वतः करियारच्या आणि स्व च्या शोधात घर सोडून बाहेर पडलेली स्त्री अनेक वर्षांनी मुलाला भेटते.
घर-संसाराला कंटाळून, नवर्‍याच्या नातेवाईकाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून पुन्हा संसारात अडकतेे..
एक श्रीमंत युवक गृहिणी हवी म्हणून साध्या मुलीशी लग्न करतो आणि बाहेर धंदे करतो ते त्या सतीसावित्रीला कळते ..
प्रेमाच्या त्रिकोणात प्रेमभंग आणि त्यातून बदला...
मैत्रिणीच्या नवर्‍याच्या प्रेमात पडून त्याला पुन्हा आपल्या बायकोकडे पाठवणारी मैत्रीण..
कुमारी माता, मूल नाकारणारा पुरुष आणि काही वर्षांनी त्यांची होणारी पुनर्भेट..
इ.

यातल्या स्त्री-पुरुषांना स्वतःच्या शारिरिक भूकेवर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध किंवा विवाहपूर्व संबंध ते ठेवतात. मानसिक आधार, स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या स्त्री-पुरूषाची मदत घेत वहावत जाऊन, शरिरसंबंधांपर्यंत पोचून, जुना संसार सोडून-तोडून नव्या संसारात शिरतात. पण तिथेही जुनाच खेळ पुन्हा खेळल्याची निराशा येते. त्या दृष्टीने या कथा अादर्शवादी नाहीत तर वास्तववादी आहेत. बहुतेक कथा उच्चमध्यमवर्गात घडणार्‍या आहेत. यातल्य बायका हुषार आणि पुरूष, देखणे, स्मार्ट, श्रीमंत आहेत तरीही त्यांचं हे असं. "जे जे हवे जे जीवनक्रम ते सर्व आहे लाभले, तरीही उरे काही उणे" असं वाटून दुसर्‍या स्त्री-पुरूषांत सुख शोधणारे.

कथा वाचायला चांगल्या आहेत. एकेक कथा वाचायला कंटाळा येत नाहीत. पण एकामागोमाग एक कथा वाचल्या तर एकसुरी वाटतात. गोष्टींमध्ये लेखिका फक्त निवेदकाची भूमिका घेते त्यावर स्वतः काही बोलत नाही. कथेतली पात्रंपण स्वतःशी फार काही बोलत नाहीत. धडाधड घटना घडतात, घरं सोडतात, घटस्फोट घेतात, आत्महत्या करतात. पण लेखिका त्यांच्या मनात शिरून डोकावून बघायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे परकायाप्रवेश न घडता फक्त परकायादर्शन होतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...