शब्दरंग (shabdrang)




पुस्तक : शब्दरंग  (shabdrang)

लेखिका : सत्त्वशीला सामंत (Sattwasheela Samant)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १५३
ISBN : 978-81-8483-606-6

ज्यांना "भाषा" हा विषय आवडतो त्यांच्यासाठी भाषा हे फक्त "संवादाचं माध्यम" नसतं तर जिच्याशी संवाद साधायचाय ती व्यक्ती सुद्धा "भाषा" असते. अशा भाषाप्रेमींना भाषेतल्या शब्दांचे अर्थ आणि शुद्धलेखनाचे नियम यांच्यापलिकडे जाऊन,  शब्दांशी हितगुज करून त्यांचं कूळ-मूळ शोधायची इच्छा असते. त्यांना शब्दांच्या, अर्थांच्या, अक्षरांच्या फेरफारीमुळे होणाऱ्या बदलांचीसुद्धा गंमत वाटते. अश्याचप्रकारे मराठीतल्या शब्दांची व्युपत्ती आणि त्यातल्या गमतीजमती सत्त्वशीला सामंत यांनी या पुस्तकात समजावून सांगितल्या आहेत. लोकप्रभा सापताहिकात २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.


सत्त्वशीला सामंत हे नाव मराठीत सुपरिचित आहेच. त्यांची पुस्तकात दिलेली ओळख :





मराठी भाषेचा प्रवास ढोबळमानाने संस्कृत - प्राकृत - ऐतिहासिक मराठी - आधुनिक मराठी असा झाला असं आपण म्हणतो. मोगली राजवटीमुळे फारसी, उर्दू भाषांचा प्रभाव मराठीवर पडला. शेजारच्या राज्यांच्या गुजराती, कानडी, हिंदी भाषांशीही मराठीचा संगम झाला. त्यांच्यातले काही शब्द, लकबी मराठी समाजानेही आत्मसात केल्या. एका काचेच्या भांड्यात पाणी ठेवले आणि त्यात रंगाचा थेंब टाकला की ते मिश्रण तयार होताना वेगवेगळे आकार आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे दोन भाषा एकमेकांत मिसळताना नाना प्रकारचे आकार पाहिला मिळतात. काही वेळा शब्दामधलं अक्षर बदलतं, तर काही वेळा नवीन अक्षर घुसतं. काहीवेळा शब्द जसाच्या तसा स्वीकारला जातो तर कधी अर्थाची पूर्ण उलटापालट होते. कधी नामाचं लिंग बदलून शब्द दुसऱ्या भाषेत घुसतो. हे असं का झालं, कधी झालं हे सांगणं कठीण आहे. जे रूपांतर एका शब्दात झालं तसंच ते दुसऱ्या शब्दात होईलच असं नाही. पण तरीही या बदलाची व्याकरणाच्या परिभाषेत वर्गवारी करणं शक्य आहे. अशी वर्गवारी या पुस्तकात केली आहे आणि प्रत्येक प्रकारासाठी एकेक लेख आहे.


अनुक्रमणिका :





प्रत्येक लेखात व्याकरणातली संकल्पनेची ढोबळ व्याख्या सांगून त्याची उदाहरणे मराठीत कशी दिसतात ते स्पष्ट केलं आहे. उदा. "आवळे-जावळे वर्ण"विषयी लेखांत अक्षरांची (वर्णांची) अदलाबदल कशी होते हे "य-ज","ड-र","ड-ल","र-ल" या अक्षरांच्या जोड्या घेऊन स्पष्ट केलं आहे.



काहीवेळा संस्कृत, प्राकृत यातून मराठीत शब्द येताना अक्षरेच गाळली गेली. त्याला वर्णलोप म्हणतात. पहिले अक्षर गाळले गेले तर आदिवर्णलोप, शेवटचे अक्षर गाळले गेले तर मध्यवर्णलोप इ. सगळे प्रकार वेगवेगळ्या लेखात समजावून सांगितले आहेत. आदिवर्णलोपाचे हे पान बघा.



वर्ण गाळले जातात तसे काहीवेळा शब्दातल्या अक्षरांचे जोडाक्षर होऊन शब्दात बदल होतो. हे पहा :



मराठी, संस्कृत मध्ये तीन लिंग आहेत - पुलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. हिंदीत दोनच आहेत. हिंदीवर फारसीचा परिणाम आहे. त्यामुळे हिंदीचे संस्कृतीकरण करण्यात आले तेव्हा नामे संस्कृतमधली पण त्यांची लिंगे फारसीप्रमाणे यामुळे कशी गडबड झाली आहे ते वाचा:



मराठीतही काही शब्द उभयलिंगी आहेत. आपण अगदी सहजपणे एकच शब्द दोन्ही पद्धतीने शब्द वापरतो. पण लेखिकेने ते असं ते आपल्यासमोर मांडलं की आपली आपल्यालाच गंमत वाटते.


साठच्या दशकात नवीन शुद्धलेखन नियमांमध्ये अनुच्चारित/अस्प्ष्टोच्चारित अनुस्वार गाळावेत असा नियम आहे. त्यामुळे लेखन सोपं झालं हे खरं, पण या अनुस्वारांअभावी कधी एकाच वाक्याचे दोन अर्थ निघू शकतात. वाचणाऱ्याचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे हा नियम चुकीचा आहे असं लेखिकेचं म्हणणं आहे. हे नियम अस्तित्वात येण्याआधीचं मराठी लिखाण तरी पूर्वीच्या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे म्हणजे त्या काव्यांचा, लेखनाचा चुकीचा अर्थ नवीन पिढी घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी पुस्तकात दिलेल्या नमुन्यांपैकी एक.





शब्दांचा हा प्रवास, त्याप्रवासात त्यातल्या अक्षरांनी मारलेल्या उड्या, त्यांचे रुसवे फुगवे, परभाषेतल्या शब्दांना आपलेसे करताना त्यांच्या मराठीकरणाची प्रक्रिया हे वाचणं, ज्ञानवर्धक आणि तितकंच मनोरंजकही आहे. ज्याला आपण शुद्ध मराठी शब्द समजत होतो तो पण असा मूळ परकीयच असावा या ज्ञानातून रोजच्या वापरातल्या शब्दांकडे बघण्याची वेगळी दृष्टीकोन देणारं आहे. आपल्यालाही शब्दांशी खेळायला, त्यांच्या आत डोकावून बघायला उद्युक्त करणारं पुस्तक आहे.  व्याकरणाच्या संकल्पनांवर आधारित स्पष्टीकरण असल्यामुळे एखाद्या संदर्भ पुस्तिकेसारखा त्याचा वापर पुन्हा पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे पुस्तक फक्त वाचनीयच नाही तर संग्राह्य सुद्धा आहे




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...