पु.ल. (चांदणे स्मरणाचे) - (Pu.La. Chandane Smaranache)



पुस्तक : पु.ल. (चांदणे स्मरणाचे) (Pu.La. Chandane Smaranache)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३०६
ISBN : 978-93-86628-47-3

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु.ल.देशपांडे यांचे हे चरित्र आहे. पुलंनी आयुष्यभरात लेखन, नाट्यदिग्दर्शन, संगीतसंयोजन, भाषणे, दूरदर्शन कार्यक्रम, प्रवास अशा नाना क्षेत्रात यशस्वी मुशफिरी केली. मराठी माणसाला भरभरून आनंद दिला. लहानांपासून कर्तृत्ववान लोकांपर्यंत अनेकांशी स्नेहबंध जुळवले. त्यामुळेच त्यांचं जीवन हे कितीतरी लहान मोठ्या महत्त्वाच्या प्रसंगांनी भरलेलं आहे. ते शब्दांत बांधणं आणि मर्यादित पानांमधे मांडणं अवघड आहेच. ही जाणीव मान्य करून मंगलाताई मनोगतात लिहितात ...


(फोटोंवर क्लिक करून झूम करुन वाचा)

"चांदणे स्मरणाचे" असं शीर्षकाखाली म्हटलं असेल तरी पुस्तकाचं अधिकृत नाव फक्त "पु.ल." इतकंच आहे. पुलंच्या लहानपणापासून निधनापर्यंतचं पूर्ण आयुष्य या पुस्तकात समाविष्ट आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.


"It takes a village to raise a child" अशी एक इंग्रजी(आफ्रिकन) म्हण आहे. पुलंच्या जडणघडणीतसुद्धा त्यांच्या गावाचा - पार्ल्याचा - मोठा वाटा आहे. त्याबद्दलची ही झलक.



पुलंची विनोदी पुस्तके, नाटके, नाट्यप्रयोग या सगळ्यांच्या जन्मकथा पुस्तकाच्या ओघात येतातच. प्रत्येकाच्या कहाण्या वेगळ्या आहेत. पुलंच्या आतला कलकाराचा आविष्कार म्हणून निर्मिती तर बहुतांशी आहेच. पण कधी एखाद्या संस्थेची गरज म्हणून, कधी तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज म्हणून तर कधी संपादकांनी विश्वासाने त्यांच्याकडून लिहून घेतलं म्हणून असं विविध कारणांनी त्यांचं लेखन झालं आहे. हे सगळे प्रसंग वाचायला सुद्धा खूप छान वाटतं. जणू आपण आत्ता पुलंच्या बरोबर आहोत आणि ते एकेक काम करत चाललेत असं वाटतं. 

पुलंच्या ह्या परिचित बाजू इतकीच पुलंच्या कमी परिचित बाजू बद्दलसुद्धा पुस्तकात सविस्तरपणे लिहिलं आहे हे या पुस्तकाचं महत्त्व आहे. म्हणून त्याविषयीच्या भागाची माहिती जरा जास्त सांगतो. उदा. त्यांच्या आकाशवाणी आणि दूरदर्शन मधील कार्यकाळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली तेव्हा पहिले अधिकारी म्हणून पु.ल. होते. त्याबद्दल वाचा.



अजून एक कमी परिचित बाजू म्हणजे पु.लंचा राजकारणातला सक्रीय सहभाग. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचारात सहभग घेऊन आणीबाणीविरुद्ध, कॉंग्रेसविरुद्ध सभा घेऊन आवाज उठवला होता. जयप्रकाशांच्या डायरीचा मराठी अनुवाद केला होता. त्या भागातला एक नमुना.



पुलंना अनेक मानसन्मान मिळाले, कलाकृतींच्या मानधनातून पैसे मिळाले आणि त्यांनी तितक्याच निरसलसतेने ते समाजकार्यात देणगी किंवा संस्था स्वरूपात रुजवले. पुलंच्या पत्नी सुनीताबाईंचं व्यवहारीपण आणि तितकीच त्यागी वृत्ती यातून हे दांपत्य एकमेकांना कसं पूरक होतं हे जाणवतं. अशा अनेक प्रसंगातील एक प्रसंग.

पुलंनी सहित्य, नाट्य क्षेत्रात नवनवे प्रयोग केले त्यामुळे अनेक गोष्टी मराठी समाजात "सर्वप्रथम" करण्याचं श्रेय त्यांना जातं. केवळ त्यांनी केलेल्याच नव्हे; तर त्यांच्या बाबतीत घडलेल्या उपक्रमांमध्येसुद्धा हा पहिलेपणा आहे. हल्ली अगदी सराईत्पणे वापरला जाणारा शब्द म्हणजे "जीवनगौरव पुरस्कार". तोदेखील पुलंनीच सुचवलेला. अशा पहिलेपणाच्या गंमतीची ही झलक.


पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात पुलंच्या कार्याचा, लोकप्रियतेचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गोषवारा घेण्याचा प्रयत्न केला आहे. "पु.ल. समजून घेताना", "नक्की कसे होते पु.ल.", "पु.ल. हे काय रसायन होतं", "पु.ल. एवढे आपले का वाटतात" अश्या प्रश्नावर दीर्घ निबंध लिहायला सांगितला तर काय लिहू काय नको असं होऊ शकतं. कितीही लिहिलं तरी काहीतरी राहिलंच अशी भावना होईल. पण मंगलाताईंनी चांगलाच यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यातलं एक पान

पुलंवर समीक्षकांनी वेळोवेळी केलेली टीका आणि पुलंनी त्याला दिलेली उत्तरे (बहुतेक वेळा अनुत्तरेच); पुलंच्या राजकीय,-सामाजिक भूमिकांबद्दल झालेल्या टीका, त्यांच्या यशस्वीतेमागे "खंबीर न वगता सगळ्यांशी गोड राहण्याचा अट्टाहास" होता असे विश्लेषण इ. सुद्धा प्रसंगोपात सांगितलं आहे. त्यामुळे पुस्तक पूर्णपणे एकांगी न होता, थोडं मध्याकडे झुकतं. याहून अधिक विश्लेषण, समीक्षा असती तर पुस्तक कंटाळवाणं झालं असतं. आणि मराठी माणसाने आत्तापर्यंत या टीकेकडे केलेलं दुर्लक्ष पाहता तसाही असा मजकूर त्यांनी फार मनावर घेतला नसता :)) 



सुनीताबाईंच्या सहभागाबद्दल अजून लिहायला हवं होतं. कदाचित सुनीताबाईंवर लेखिकेने स्वतंत्र पुस्तक लिहिलं असल्यामुळे इथे फार लिहिलं नसावं. पण या पुस्तकाच्या परिपूर्णतेसाठी थोडं जास्तीचं लिखाण किंवा एखादा स्वतंत्र लेख पुस्तकात समाविष्ट व्हायला हवा असं मला वाटलं.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीतल्या पुलंच्या भाषणाचा एखादा पूर्ण उतारा हवा होता. त्यांनी जयप्रकाशांच्या डायरीचं भाषांतर केलं. ते काम गुप्त राखण्यासाठी त्यावेळी ते सभा-बैठका-विरोध यांपासून दूर रहिल्याचा वृत्तांत पुस्तकात आहे. पण त्याआधी किंवा नंतर, आणीबाणीच्या एकूण दीड वर्षांच्या काळात पुलंनी काही थेट विरोध केला, आंदोलन केले, त्यांच्या वक्तव्य/लिखाणावर बंदी आली, दुर्गाबाईंप्रमाणे कारवाई झाली असं पुस्तकातून तरी कळत नाही. विरोध सभा या नंतरच्या आहेत. त्यामुळे त्या दीड वर्षांतले पु.ल. दिसत नाहीत.

हे पुस्तक तयार करतना पुलंबद्दलची अल्पपरिचित माहिती मिळवण्याची मेहनत लेखिकेला करावी लागली असेलच. दुसरं म्हणजे, पुलंच्या बाबतीत त्यांनी स्वतः आणि इतरांनी एवढं लिहिलं आहे आणि अजून बरंच काही सांगायला लोक उत्सुक असतील; की या "अति माहिती" मधून योग्य वेचण्याचं कठीण काम लेखक-संपादक मंडळींना करावं लागलं असेल. त्याला योग्य  न्याय दिल्याचं दिसतंच आहे. लेखिकेने त्यांच्या सहज संवादी लेखन शैलीतून ही सगळी फुलं छान गुंफली आहेत की पुलप्रेमींना पुस्तक खाली ठेवायची इच्छा होत नाही.

पुलप्रेमी, पुलद्वेषी(असं आहे कोणी?) सर्वांनी बहुरूपी, बहुगुणी आणि थोर होऊनही साधा माणूस राहिलेल्या ह्या आपला माणसाचं चरित्र नक्की वाचावं.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



1 comment:

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...