पारखा (Parkha)

 



पुस्तक : पारखा (Parkha)
लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा : कन्नड (Kannad) 
अनुवाद : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
पाने : २७६
ISBN : 978-818-498-9014


कर्नाटकातल्या एका लहान खेड्यात, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासच्या काळात घडणारी ही कथा आहे. शेती आणि पशुपालनावर आधारलेली अर्थव्यवस्था असणारं, आधुनिकतेचा स्पर्श न झालेलं हे खेडं आहे. इथे लोक गायी फक्त पाळत नाहीत तर भारतीय संस्कृतीला अपेक्षित असा गोमाता म्हणून तिचा आदर करतात. गोपूजेचं महत्त्व आणि भक्ती हा गावाचा स्वभाव आहे. अश्या या गावात काळींगा गौडा हा गावचा पाटील, मोठा गोठा असणारा आणि गायींचा प्रेमाने सांभाळ करणारा आहे. हे प्रेम कसं आहे हे या प्रसंगातून कळेल.
गावातल्या काही वादवादीमुळे गावात चरणाऱ्या गुरांसाठी कोंडवाडा तयार करावा लागला होता. त्यात आलेल्या गायीची कशी काळजी घेतो पहा.






या काळींगाचा नातू - त्याचं नाव पण काळींगाच - तो अमेरिकेत शिकून येतो. आपलं गाव, समाज सोडून दुसरीकडे गेलं की नव्या जाणिवा तयार होतात. नवे विचार समजतात. आपले आचारविचार जुनाट वाटू शकतात. काळींगाचं तसंच होतं. अश्यावेळी गावकरीच पुढे येऊन त्यांच्या घरचं श्राद्धपक्ष करतात. खेडोपाडी दिसणारी परस्पर सहकार्याची भावना आणि काळींगाबरोबर संस्कृती संघर्षाची ठिणगी इथे आपल्याला दिसते.








पुढे काळींगाची अमेरिकन बायको भारतात आल्यावर हा संघर्ष धारधार होतो. "गाय ही देवता" आणि "गाय हा उपयुक्त पशू" हा तात्त्विक वाद घडू लागतो. काळींगाबरोबर वाढलेला गावच्या पुरोहितांचा मुलगा - वेंकट -त्याचा मित्र. वेंकट शाळा शिकलेला आणि पौरोहित्य शिकलेला असल्यामुळे तो या दोघांशी बोलतो, समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक संवाद हा वादातच परिवर्तित होत राहतो. हे वाद-संवाद या कादंबरी चा आत्मा आहे. त्याचं हे एक उदाहरण. 




प्रसंगी वेंकट शास्त्रार्थ सांगतो आणि आपल्या मंत्रांमध्ये गायींबद्दल काय म्हटलं आहे हे सांगतो. गोपूजेची जाणीव आपल्या संस्कृतीत किती पुरातन काळापासून रुजली आहे त्याचंच हे द्योतक आहे.






पुढे काळींगाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की ज्यामुळे; गाय म्हणजे फक्त उपयुक्त पशू का त्याहून अधिक काही; पाश्चात्त्य विचार का भारतीय विचार याची घुसळण आता त्याच्या मनात शिरू लागते.

वाचताना मला असं वाटलं; की गाय आपल्याला दूध देते म्हणून आपण गायीला देव मानतो. पण मग म्हशीला का नाही ? मांसाहार सुद्धा पूर्ण भारतात वर्ज्य नाही. वेदांमध्ये सुद्धा पशुबळीचे उल्लेख आहेत. केवळ "कमी दर्जाची उपासना पद्धती" म्हणून तिची बोळवण करता येईल का ?  पुस्तकातला काळींगा आजोबा म्हणतो, "वासरांनी पिऊन जेवढं दूध राहील तेवढंच आपण घ्यायचं. आपण गाईंना भरपूर खायला घातल्यामुळे जेवढं जास्तीचं दूध मिळेल तेवढंच आपलं." हा विचार खूप भूतदयावादी वाटतो. पण खायला प्यायला घालून गायींन जास्त दूध द्यायला लावणं हा सुद्ध्य त्यांच्यावर अत्याचारच नाही का? माणसाला हवं त्याच वाळूबरोबर गायीचा संग घडवून आणणं हे सुद्धा परंपरेतच आहे. यात कुठे आहे गायीच्या भावनांचा विचार ? इथे भारतीय समाज सुद्धा गाईला उपयुक्त पशूच समजतो आहे ना ? दुसरीकडे असं दिसतं की पाश्चात्त्य देशांमध्ये दूध, मांसासाठी जनावरांची पैदास करणे, शेतीच्या रसायनीकरणातून उत्पादन वाढवणे आणि बेसुमार जंगलतोड यातून झालेला फायदा हळूहळू या पृथीलाच नाशाच्या उंबरठ्यावर नेट आहे. मग असं वाटतं की कोणे एकेकाळी आपल्या समाजाची अवस्था सुद्धा आजच्या पाश्च्यात्त्य समाजासारखीच असेल. निसर्गाचा उपभोग घेता घेता हळूहळू आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं असेल की निसर्गाकडून कितपत "घेतलं" आणि कितपत "परत दिलं" की आपला स्वार्थ आणि निसर्ग याचा समतोल राहतो. आणि त्यातून आपल्या संस्कृतीतल्या प्रथा परंपरा  यमनियम बनले असतील. आता त्यातलं विज्ञान. अर्थशास्त्र, दूरदृष्टी आपण विसरलोय आणि राहिलेत फक्त पोथ्यांमधले नियम. त्यामुळे ऐहिक जगण्याच्या प्रश्नांना या भावनिक नियमांची उत्तरे थिटी पडतायत. 
पुन्हा एकदा निसर्गाचा जास्तीत जास्त वापर, त्याचे दुष्परिणाम, त्यातून आलेली समज आणि मग एक समंजस संस्कृती या प्रवासावर पाश्च्यात्य देशांच्या साथिने आपण निघालो आहोत  !!

दोन संस्कृती मधला हा सनातन वाद अश्या भावनिक पातळीवरून सुरेख पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे वैचारिक वाद कंटाळवाणा होत नाही. कुठल्याही एका बाजूने न लिहिता समतोल लिहिलं आहे त्यामुळे पुस्तक प्रचारकी थाटाचं होत नाही. आपण सुद्धा वाचताना प्रत्येक पात्राशी समरस होऊन त्याचा त्याचा विचार समजून घेत पुढे जातो. पुढे काय होतंय याची उत्सुकता वाढवत राहते. आपणसुद्धा साधकबाधक विचार करू लागतो.

अनुवादाबद्दल प्रश्नच नाही. भैरप्पांची पुस्तके आणि उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद हे समीकरणच आहे. ते तितकंच सार्थ आहे. हा अनुवादसुद्धा त्या यशस्वी मालिकेतलं एक सुंदर पुष्प आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती 



अनुवादिकेची पुस्तकात दिलेली माहिती 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...