पुस्तक - जत्रा दिवाळी अंक २०२१ (Jatra Diwali Edition 2021)
भाषा - मराठी
पाने - १७४
विनोदी दिवाळी अंकांमध्ये अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे जत्रा. "चावट खिडकी चित्रे", विनोदी कथा, वात्रटिका, व्यंगचित्रे असं नेहमीचं अंकाचं स्वरूप ह्यावर्षी सुद्धा आहे. खिडकी चित्र एकच आहे. पण विनोदी गोष्टी आणि व्यंगचित्रे भरपूर आहेत.
अनुक्रमणिका
उळन खटिया - वऱ्हाडातल्या गावातले दोन कारागीर खाटेला पंखा लावून ती उडवण्याची शक्कल लढवतात. मग ती खाट खरी कशी उडते, तिचं उदघाटन करायला गावातलं राजकारण कसं रंगतं ह्याची धमाल सांगणारी ही कथा आहे. विनोदी प्रसंग आणि त्याला खास वऱ्हाडी बोलीचा मजा अशी दुहेरी धमाल ह्यात आहे.
नमुन्यादाखल त्यातली दोन पाने.
गेले काही वर्ष आपल्याकडे शालेय शिक्षणांत नवनवे निर्णय आणि त्यांची धरसोड चालू आहे. शिक्षणाचं हसं झालं आहे. ह्या ताज्या घडामोडींना एका काल्पनिक सूत्रात गुंफून सादर केलं आहे प्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांनी.
सिद्धहस्त लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत कथा सादर केली आहे. अमेरिकेतून भारतात आलेल्या मराठी पण आता जणू "अनिवासी अमेरिकन" कुटुंबातल्या गृहिणीची "वृंदावन" शोधताना होणारी धावपळ.
बागेत शिरलेल्या किड्यांमुळे बागेची झाली. पण बागेत किडे (घोंघे) शिरलेच कसे ह्याचा शोध घेताना भेटलेल्या वल्ली दाखवल्या आहेत "घोंघ्यांनी मज पछाडले" गोष्टीत.
लग्न ठरवताना मुलामुलींची पत्रिका बघितली जाते पण खरं तर दोन्ही कुटुंबाचे सुद्धा गुण जुळले पाहिजेत कारण लग्नामुळे शेवटी दोन्ही कुटुंब देखील एकत्र येतात. पण त्यासाठी सगळ्यांच्या पत्रिका कशा मिळवायच्या ? पण एक लग्न जुळवणारे गुरुजी नवीन व्यवसाय सुरु करतात की आम्हाला कंत्राट द्या आम्ही सगळं हे जुळवून आणतो. ते हे सगळं कसं करतात त्याची गमतीशीर गोष्ट आहे "... पेगासस हेरगिरी "
दोन लेख भाषाविषयक आहेत. इंग्रजीतल्या अनियमिततेमुळे खरं तर किती हास्यास्पद भाषा तयार झाली आहे हे सोदाहरण मांडणारा एक लेख आहे.
एकीकडे इंग्रजी स्पेलिंग्स इतकी अनियमित तरी आपण ती पाठ करतो. इंग्रजी वापरताना स्पेलिंगची चूक झाली किंवा व्याकरणाची चूक झाली की आपण दुसऱ्यांना हसतो. मात्र आपली मातृभाषा वापरताना प्रमाणलेखन, व्याकरण, शब्दांचे अर्थ ह्याचा आपण तितका विचार करतो का ? फेसबुक व्हॉट्सप वरच्या लेखनात तर लोक असंख्य चुका करतातच पण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या ह्यांच्या बातम्या सुद्धा बऱ्याच वेळा "भयंकर मराठी"त लिहिलेल्या असतात. अश्या मराठीच्या मारेकऱ्यांचा समाचार घेतलाय मिलिंद शिंत्रे यांनी. मराठी लेखनातल्या चुकांची उदाहरणे आणि त्यावर शिंत्रे ह्यांची तिरकस शेरेबाजी असं लेखाचं स्वरूप आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर अजून बरीच उदाहरणं वाचता येतील. https://www.facebook.com/milind.shintre.5
उदा.
असा हा खुदुखुदू हसायला लावणारा, कधी गुदगुल्या करणारा तर कधी चिमटे काढणारा; "ताण विरहित"करणारा दिवाळी अंक आहे. सभ्यतेची पातळी फार घसरु न देता, सामाजिक भावना न दुखावता हसवणं - जे हल्ली कमी झालंय - तसा हसवणारा हा "जत्रा" अंक आपल्याला जत्रेतल्या पाळण्यात बसल्याची मजा देईल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment