लीन इन (Lean in)





पुस्तक : लीन इन (Lean in)
लेखिक : शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ भाषा : इंग्रजी (English)
अनुवाद : अशोक पाध्ये (Ashok Padhye)
पाने : २१२
ISBN : 978-0-75354-163-0

’फेसबुक’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅंडबर्ग यांनी नोकरी-व्यवसायात स्त्रियांचे प्रमाण, त्यांची प्रगती, त्यात येणाऱ्या अडचणी यांचा ऊहापोह करणारे हे पुस्तक लिहिले आहे. 

लेखिकेविषयी पुस्तकात दिलेली माहिती:



"चूल आणि मूल" हीच स्त्रियांची कार्यक्षेत्रं आहेत असा पारंपारिक समज आता मागे पडला आहे. आता मुली शिकतात, नोकऱ्या करतात, व्यवसायात मोठ्या पदावर जातात, आय.टी. उद्योगापासून लष्करांपर्यंत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. हे भारतासारख्या विकसनशील आणि परंपरा जपणाऱ्या समजात घडतं आहे; तर अमेरिकेसारख्या भौतिकदृष्ट्या विकसित देशात तर ही स्थिती फार छान असणार यात शंकाच नाही. तरीही लेखिकेला सद्यस्थिती खूप आनंददायक, समधानकारक वाटत नाही हे विशेष. 

या संदर्भात लेखिकेने पुढील प्रश्नांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. समाजात सुमारे ५०% स्त्रिया असतील तरी नोकरी-व्यवसायात ५०% किंवा त्या प्रमाणात स्त्रिया का दिसत नाहीत? जितक्या प्रमाणात स्त्रिया नोकरीत येतात तितक्या प्रमाणात त्या सर्वोच्च पदावर पोचलेल्या का दिसत नाहीत? बऱ्याच स्त्रिया आपलं करियर अर्धवट सोडून का देतात? स्त्रियांची बढती आणि प्रगती पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत हळू का होते? इ. हे सर्व प्रश्न अमेरिकन समाज, अमेरिकन स्त्रिया आणि अमेरिकन उद्योग-व्यवसाय यांना समोर ठेवून हाताळले आहेत.

लेखांच्या नावावरून थोडी कल्पना येईल:


स्त्री-पुरुषांबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन अजूनही मोठ्या प्रमाणावर यासाठी जबाबदार आहे असं त्यांचं निरीक्षण आहे. नेतृत्त्व, महत्त्वाकांक्षा, झोकून देऊन काम करणे असा स्वभाव एखद्या पुरुषाचा असेल तर ते गुण मानले जातात. तेच गुण एखाद्या महिलेने दाखवले तर ती "पुरुषी", "आयर्न लेडी" इ. ठरते. स्त्रीने महत्त्वाकांक्षी असण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन जाणारं, इतरांची काळजी करणारं असलं पहिजे अशी अपेक्षा असते. आणि त्यातून स्त्रियांच्या प्रगतीत अदृश्य अडथळे निर्माण होतात. 

लेखिकेचं अजून म्हणणं आहे की महिला स्वतःला पुरुषांपेक्षा कमी लेखतात. आपल्याला जमणार नाही असा कमी आत्मविश्वास स्वतःच ठेवतात. त्यामुळे मोठी संधी, स्वतःला सिद्ध करून दाखवायची संधी आपल्याला मिळणारच नाही असं गृहित धरून मागणी करायलाच कचरतात. हे महिलांनी सोडलं पाहिजे. "लीन इन" - स्वतःच्या आत डोकावून पहा, स्वतःच्या शक्तीचा शोध घ्या, संधी मिळवा, यशस्वी व्हा असाच पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. 


करिअर मध्येच सोडणाऱ्या स्त्रियांनाही त्यांचं कळकळीचं आवाहन आहे की योग्य वेळ येण्याआधी, घाईघाईने नोकरी सोडू नका. "टेबलापाशी बसा". आपल्या अडचणी समोरच्याला समजावून सांगा. चर्चेतून मार्ग काढा. तुमची कंपनी, अधिकारी यांची धोरणे आणि स्वभाव तुम्हाला मदत करण्याचा असू शकेल पण त्याचा धांडोळा तर घ्या. मगच निर्णय घ्या. नोक्री बदलून बघा, करियरचे कार्यक्षेत्र बदलून बघा. पण नोकरी-व्यवसायापासून पूर्ण वेगळे होण्याची घाई करू नका. 
 उदा. काहि कम्पन्यांमध्ये मार्गदर्शक - मेंटॉर - निवडण्याची पद्धत असते. त्याबद्दल लेखिकेने लिहिले आहे.



स्त्रीच्या करियरमधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळंतपण. सुट्टी घ्यावी की नोकरी सोडावी? किती सुट्टी घ्यावी? मुलाच्या जन्मानंतर किती सुट्टी घ्यावी? कामाला किती वाहून घ्यावं आणि मुलांना किती वेळ द्यावा? हे नेहमीचे प्रश्न लेखिकेलाही जगावे लागले आणि इतर उच्चपदस्थ स्त्रियांनाही. त्यांनी ते प्रश्न त्यांच्या पातळीवर कसे सोडवले; त्यांच्या जोडीदाराची साथ कशी मिळाली हे देखील एका प्रकरणात लिहिले आहे. मुलं सांभाळण्याच्या बाबतीत उलट लिंगभेद केला जातो. मुलांना सांभाळण्याचं काम आपल्या नवऱ्याला असं बायका समजतात. तसं समजू नका असा लेखिकेचा सल्ला आहे.


"सर्व काही करण्याची" मिथ्या कल्पना सोडा असं त्या म्हणतात. उपलब्ध वेळ, साधन सामुग्री मर्यादित आहे त्यामुळे सगळं काही जमेलच असं नाही. किंबहुना जमणं कठीणच आहे. त्यामुळे मनात सतत अपराधी भवना ठेवण्याची गरज नाही. 

पुस्तक महिलांविषयीचं असलं तरी व्यव्यसायात पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्या; घर-ऑफिसची कसरत करणाऱ्या पुरुषांनाही यातल्या गोष्टी लागू पडतीलच. तसं पाहिला गेलं तर यातले प्रश्न आणि त्यांवर लेखिकेचं भाष्य हे खूप काही नवीन सांगतं अशातला भाग नाही. या समस्या आणि त्यांच्यावरचे उपाय - ऑर्गनाईज व्हा, जोडीदाराल कामात सहभागी करा, झोकून द्या इ. गोष्टी सर्वसाधारणच आहेत. अमेरिकन समाज केंद्रस्थानी असल्यामुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेत स्त्रीला जादा जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात पण त्याच वेळी घरातल्या मोठ्यांच्या रूपाने एक आधार - सपोर्ट सिस्टीम - उपलब्ध होते. अशा पर्यायांचा लेखिकेने काही विचार केलेला नाही. ज्या स्त्रिया करियर करतात त्यांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर काही बरा-वाईट परिणाम होतो का याचाही काही विचार केलेला नाही. स्त्री नोकरी करत असेल तर मुलांना दाईने सांभाळण्याचा किंवा पाळणाघरात ठेवण्याचा खर्च अमेरिकेत, युरोपियन देशांत खूप आहे. जोडप्यापैकी एकाचा पगार त्यातच जातो असं तिचं निरीक्षण आहे. पण या ताळेबंदात मुलं आणि आईचे संबंध, त्यांच्यावर होणारे संस्कार अशा अमूर्त पैलूंचा विचार केलेला नाही. त्यमुळे पुस्तक अपूर्ण वाटतं.

नोकरीच करा, घर-मुलं सांभळणं कमीपणाचं आहे असं लेखिकेने म्हटलेलं नाहीये. तो निर्णय सर्वस्वी वैयक्तिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण नोकरी-व्यवसाय-करियर करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी अनुकूल मनोभूमिका कशी असावी हे या पुस्तकातून जाणवेल. पुरुष वाचकांनासुद्धा नोकरी करणाऱ्या महिला कुटुंबीय आणि ऑफिसमधल्या महिला सहकारी यांच्याबद्दल अजून प्रगल्भ विचार करायला प्रवृत्त करेल.


-----------------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
-----------------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...