Born A Crime (बॉर्न अ क्राईम)
पुस्तक : Born A Crime (बॉर्न अ क्राईम)
लेखक : Trevor Noah (ट्रेव्हर नोआह/नोहा)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २८५
ISBN : 978-1-473-63530-2

ट्रेव्हर नोआह हा इंग्रजी मधला प्रसिद्ध विनोदी कलाकार, स्टॅंडप कॉमेडिअयन, टीव्ही-रेडिओ सूत्रधार आहे. तो दक्षिण आफ्रिकन आहे. या पुस्तकात त्याने त्याच्या बलपणाविषयी सांगितलं आहे. एका कलाकाराचं बालपण म्हटल्यावर, तो कलाकार म्हणून कसा घडला किंवा कलोपासना करण्यासाठी त्याला कशी धडपड, संघर्ष करावा लागला याबद्दल लिहिलं असेल असं वाटेल. पण तसं नाहीये. याचं कारण त्याची सामाजिक पार्श्वभूमी. 

दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या लोकांच्या राज्यात वर्णभेद पाळला जात असे.  पण ब्रिटीशांनंतर राज्यावर आलेल्या डच वंशीय गोऱ्या लोकांच्या राज्यात त्याचं प्रमाण भयानक आणि कायदेशीर झालं (aprthied). गोरे, काळे, रंगीत, आशियाई असे वर्णाच्या आधारे भेद होते. गौरेतर लोकांना कमीपणाची वागणूक दिली जात असे. गौरेतर वर्णीयांसांठी जी ठिकाणे राखीव ठेवली आहेत तिथेच त्यांनी राहायचं, दिवसा गोऱ्यांच्या वस्तीत काम करायचं, संध्याकाळी परत जायचं. सार्वजनिक बसने प्रवास करायचा नाही. काळ्यांच्या वस्तीतच त्यांच्यासाठी जुजबी शिकवणाऱ्या शाळा होत्या, त्यांना विशेष इंग्रजी शिकवलं जायचं नाही. काळ्या-गोऱ्या किंवा काळ्या-मिश्रवर्णीय व्यक्तींनी लग्न करणं तर अशक्यच होतं आणि तो सामाजिक गुन्हाही होता. त्याला जबरी शिक्षा होती. पण समाजात प्रत्येक नियमाला पळवाट शोधणारे, कायदा वाकवणारे असतातच. त्यामुळे तेव्हाही लपूनछपून गोऱ्यांच्या वस्तीत राहणारे काळे लोक, त्यांना मदत करणारे, पैशांच्या बदल्यात कायदा मोडू देणारे डचेतर गोरे लोक होते. या पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन एक बंडखोर काळी युवती शहरात आली. गरीबीच्या दुष्टचक्रातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी शहरात नोकरी करू लागली. एका गोऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. मुलाला जन्म द्यायचा गुन्हा करायला तयार झाली. आणि जन्मजात गुन्हेगार ठरलेल्या ट्रेव्हर नोआह चा जन्म झाला.
ट्रेव्हर वर्णाने मिश्रवर्णाचा झाला. तेव्हाच्या नियमानुसार त्याचे आई-वडील एकत्र राहू शकत नव्हते. क्वचित कधी वडिलांबरोबर ते बाहेर गेले तर वडील रस्त्याच्या या बाजूला व ट्रेव्हर आणि त्याची आई दुसऱ्या बाजूला असे चालायचे. ट्रेव्हर पण आईच्या पुढे पाच पावलं. कारण गोऱ्या माणसाबरोबर काळी बा दिसली तर गुन्हा. काळ्या बाईबरोबर मिश्रवर्णीय मूल दिसलं तर गुन्हा. 

आईनेच त्याला वाढवलं. त्यामुळे वर्णाने मिश्र पण संस्कारने काळा असा अजून एक वेगळाच सामाजिक पोटभेद त्याच्या रुपाने वावरायला लागला. ट्रेव्हरच्या आईसारख्या मुलींनी आपल्या प्रियकरांबरोबर देशाबाहेर पळून जाऊन आपली सुटका करून घेतली. पण ट्रेव्हरची आई म्हणायची "हा माझा देश हे; मी का पळून जाऊ?" जमेल तसं, कधी लपूनछपून, कधी पळवाटा वापरून ती आपल्या मुलाला वावत राहिली. हे बालपण, ट्रेव्हरच्या आईची शिस्त, आजूबाजूच्या लोकांचे प्रतिसाद आणि त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांतून सामजिक परिस्थितीची जाणीव हे या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. उदा. मुलाने शिस्तीने वागावं, इतर काळ्या मुलांसारखं कायदा मोडू नये असे त्याच्या आईला वाटायचं. हे संस्कार बिंबवायची तिची पद्धतही कडक होती. हा एक प्रसंग वाचा.
(फोटोंवर कॅलिको करून झूम करून वाचा)पुढे गोऱ्यांचं राज्य गेलं, नेल्सन मंडेला अध्यक्ष झाले, वर्णभेद कागदोपत्री संपला. पण लोकांच्या मनातून, समाजातून तो काही लगेच पूर्णपणे गेला नाही. जसं भारताला स्वातंत्र्य मिळताना हिंदू-मुसलमान दंगे झाले तसेच दंगे दोन आफ्रिकन जमातीत झाले; वर्चस्व कुणाचं असावं यावरून. ते दंगे आणि त्या दंग्यांच्या दिवसातही ट्रेव्हरची आई कशी जहांबाजपणे वागत होती, मुलाला सांभाळत होती. हे ट्रेव्हरने खूप उत्कंठावर्धक प्रसंगातून सांगितलं आहे.

जसं भारतात पुष्कळ भाषा तशा आफ्रिकेतही. कुठली भाषा मुख्य ते ठरणं अवघड. म्हणून आपल्यासारखंच इंग्रजी ही मुख्यभाषा आणि १२-१३ आफ्रिकन जमातींच्या भाषा या अधिकृत भाषा असंच ठरलं. भारत असो वा दक्षिण आफ्रिका मनसिकता तीच. ट्रेव्हर मिश्र वातावरणात वाढत असल्यामुळे त्याला बऱ्याच भाषा जुजबी बोलता येत होत्या. त्याचा कसा फायदा झाला याचे पण गमतीदार प्रसंग आहेत.

वर्णभेद सर्वांच्या मनात इतका पक्का रुजलेला की, ट्रेव्हरची आजी (आईची आई) ट्रेव्हरच्या खोड्यांसाठी त्याला कधी मारायची नाही. का? तर गोऱ्या मुलाला कसं मारणार ! आफ्रिकन लोकांचं गोऱ्या लोकांनी फार पूर्वीच ख्रिश्चन धर्मात परिवर्तन केलं होतं. तरीही जुन्या रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा पूर्णपणे गेल्या नव्हत्या. आफ्रिकन समाजात मांजरींना अशुभ, जादूटोणा करणाऱ्या म्हणून मानलं जातं. त्यातून उद्भवणारे गमतीदार प्रसंग, ट्रेव्हरच्या खोड्यांतून घरच्यांची उडालेली तारांबळ हे प्रसंग खूप हसवणारे आहेत. ट्रेव्हरची आई खूप सश्रद्ध. रविवारचा पूर्ण दिवस चार-चार चर्चमध्ये जऊन प्रार्थना करायची, प्रवचनं ऐकायची. ही चर्च पण चार वर्णांची वेगळी वेगळी. ट्रेव्हर तिच्या अतिश्रद्धाळूपणाची चेष्टा कशी करायचा, त्यांच्या मोडक्या गाडीतून एकापाठोपा एक चर्च फिरताना कशी वाट लागायची याचं मजेशीर वर्णन आहे. वाचण्यातच मजा अहे. 

वर्णभेद संपल्यामुळे सगळे आता एकत्र शिकू शकत होते. ट्रेव्हरच्या ईने गरिबीमुळे बाकी कशावरच खर्च न करता ट्रेव्हरच्या शिक्षणावर खर्च करून त्याला चांगल्या शाळांत पाठवलं. इथेही वर्णाप्रमाणे मुलांचे ग्रूप. ट्रेव्हर नेहमी सगळ्यांत वेगळा. दिसायला मिश्र; संस्कृतीने काळा व आईचे संस्कार इंग्रजीचे, गोऱ्यांसारखे ! पण त्याने परिस्थितीशी जुळवून घेतलं. आपल्या वेगळेपणाचा फायदा घेत शाळेत मुलांना स्नॅक्स विकायचा धंदा सुरू केला, पुढे मित्रांच्या मदतीने पायरेटेड सीडी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. जशी आपाल्याकडे धारावीची झोपडपट्टी तशी तिथली अलेक्झांड्राची झोपडपट्टी. इथल्या सारखेच तिथेही दादा, गुंड, अवैध धंदे करणारे, चांगले लोक सगळे एकत्र नांदत होते. तिथली  समाजव्यवस्था आणि पैसे मिळवण्यासाठी मित्रांच्या बरोबरीने सुरू केलेला चोरीच्या वस्तू विकायचा व्यवसाय, सावकारीचा व्यवसाय, डीजे पार्टीचा व्यवसाय आणि तो हळूहळू कसा बुडला हे सगळं वर्णन आहे. येनकेनप्रकारेण गरीबीशी झुंजण्यासाठी, नैतिक-अनैतिक च्या भानगडीत न पडता स्वतःला फक्त जगवायचं आहे या भावनेतून केलेली ही सगळी कामं. हे वर्णन फक्त ट्रेव्हरचं नाही फक्त साउथ आफ्रिकेचंही नाही, तर वैश्विक आहे. त्यामुळे खूप भावतं. 

एकदा ट्रेव्हर वडिलांच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली गाडी घेऊन बाहेर जातो आणि नेमके पोलीस पकडतात. घरी कळलं तर पोलिसांपेक्षाही जास्त शिक्षा आई आणि सावत्र वडील करतील या भीतीने तो घरी काही कळवत नाही. आपल्या मित्राला, मावसभावाला मदत करायला सांगतो. लवकर जामीन न मिळाल्यने आठवडाभर जेल मध्ये काढावे लागतात. तिथलं राहणंही तो सुरुवातीला एन्जॉय करतो. तुरुंगात इतर कैद्यांकडून मारहाण होऊ नये म्हणून काळजी घेतो. आठवडाभराने घरी परततो, जणू काही झालंच नाही असा. त्या प्रसंगाचं मजेशीर वर्णन वाचा.
शाळेतली प्रेम प्रकरणं, डेटिंग, आईचं प्रेमप्रकरण, आईचं दुसरं लग्न, सावत्र बापाची घरगुती हिंसा, हिंसा सहन करूनही आईने नवऱ्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यामुळे आईशी आलेला दुरावा, आईचं तिसरं लग्न हे भारतीयांना न अनुभवता येणारे अनुभव विश्वही आपल्यासमोर उलगडते. अजून बरंच काय काय आहे या पुस्तकात सांगण्यासारखं. पण आता अजून लिहीत नाही.

एकूणच पहिल्यापानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारे, खुसूखुसू हसायला लावणारे पुस्तक आहे. ट्रेव्हर कॉमेडियन असल्याने शैली खूप हलकी फुलकी, संवादी आहे. प्रसंगांचं गांभीर्य वाचताना जाणवतं पण पुस्तक कधीही गंभीर, रडकं किंवा आक्रस्ताळं होत नाही ही ट्रेव्हरच्या लेखणीची किमया आहे. वर्णभेदी आफ्रिकेच्या दिवसांची सैर करून, एका खोडकर मुलाच्या बाललीला वाचून, आफ्रिकन "श्यामची आई" पाहून आपलं भावविश्व समृद्ध व प्रगल्भ करण्यासाठी अवश्य वाचा.------------------------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...