रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)



पुस्तक - रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - अनघा नाटेकर (Anagha Natekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Romeo and Juliet (रोमियो अँड ज्युलिएट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी )
प्रकाशन - वैशाली प्रकाशन, २०२६
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-48129-73-4

व्हेरोना शहरात दोन मोठी घराणी - मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट - असतात. त्यांच्यात पक्कं हाडवैर असतं. ह्या घराण्यातले दोन पुरुष समोरासमोर आले की एकमेकांना पाण्यात पाहणे, तुच्छता दाखवणे असे प्रकार घडत असतात. वादाची खुमखुमी दोन्हीकडे असल्यामुळे वादाचे पर्यावसान मारामारीत, तलवारबाजीने होऊन कोणाचानाकोणाचा जीव त्यात जात असतो. मॉंटेग्यू घराण्यातला रोमियो नावाचा तरुण एका मुलीच्या - रोझालीन -प्रेमात वेडा झालेला असतो. पण ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही म्हणून तो व्याकुळ झालेला असतो. त्याचे मित्र सल्ला देतात की तिच्यापेक्षा सुंदर मुलगी बघितलीस की तू नव्या प्रेमात पडशील. होतं तसंच. एका पार्टीत रोमियो बघतो कॅप्युलेट घराण्यातल्या ज्युलिएटला. बघता क्षणी दोघं प्रेमात पडतात. रात्री रोमियो ज्युलिएटच्या बाल्कनीत चढून तिला चोरून भेटतो. दोघं प्रेमाच्या आणाभाका घेतात. दुसऱ्या दिवशी दोघं चोरून लग्न करतात. पुन्हा आपापल्या घरी जातात.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांची मारामारी होते. रोमियो ते थांबवायचा प्रयत्न करतो पण भांडणारे लोक थांबत नाहीत. रोमियोचा मित्र मरतो. म्हणून रोमियो कॅप्युलेट व्यक्तीला मारतो. ह्याची शिक्षा म्हणून राजा रोमियोला हद्दपार करतो. ज्युलिएट प्रचंड दुःखी होते. तेवढ्यात तिचे वडील तिचं लग्न ठरवतात. चार दिवसांवर लग्नविधी ठेवतात. तेव्हा ज्या पाद्र्याने रोमियो-ज्युलिएटचं लग्न लावलं तो एक क्लृप्ती सांगतो. ज्युलिएटला असं औषध देतो की ज्यामुळे ती निपचित पडेल, मेली असं वाटेल. लग्न टळेल. तिचे कबरीत दफन होईल. रोमियोला गुप्त निरोप सांगितला जाईल आणि तो तिला कबरीतून बाहेर काढेल. साधारण त्याच वेळी औषधाचा परिणाम होऊन ती पुन्हा हालचाल करायला लागेल.

अर्धा भाग ठरल्याप्रमाणे होतो. पण रोमियोला निरोप मिळत नाही. त्याला बातमी समजते की ज्युलिएट मेली. तो रात्री तिच्या कबरीजवळ येतो. कबर खोदतो. तेव्हा तिचा नियोजित पती - पॅरिस - पण तिथे आलेला असतो. रोमियो आणि पॅरिस च्या तलवार लढाईत पॅरिस मरतो. ज्युलिएट मृत आहे असं वाटून रोमियो विष पिऊन मरतो. मग ज्युलिएट जागी होते. रोमियोला मेलेला बघून स्वतः खंजीर खुपसून आत्महत्या करते.

ही बातमी सगळीकडे पसरते. नोकराचाकरांकरवी सगळं चित्र स्पष्ट होतं. मॉंटेग्यू आणि कॅप्युलेट लोकांना पश्चात्ताप होतो. रोमियो - ज्युलिएट चा सोन्याचा पुतळा उभा करायचा निश्चय होतो.


चार पाने उदाहरणादाखल.

रोमियो रात्री ज्युलिएटच्या हवेलीखाली लपून जात असताना त्याचे मित्र थांबायचा प्रयत्न करतात तेव्हाचा प्रसंग



पाद्री फ्रायर लॉरेन्स ज्युलिएटला कबरीतून बाहेर काढायला येतो तेव्हा



अशी ही नाटकाची पूर्ण गोष्ट. शेक्सपियरच्या मी आधी वाचलेल्या दोन नाटकांत (मॅकबेथ, मर्चंट ऑफ व्हेनिस) नाटकांत जशी विचारांची गुंतागुंत, व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे, परिस्थतीचे हळूहळू परिपक्व होणे वगैरे इथे फार दिसलं नाही. रोमियो तर दिसली मुलगी, सुंदर वाटली की पड प्रेमात असाच रंगवला आहे. ज्युलिएट पार्टीत रोमियोला बघते आणि आकर्षित होते हे समजू शकतं. पण सहवास, संवाद, प्रेम अशा कुठल्याही तपशिलाच्या भानगडीत न पडता शेक्सपियर त्यांचं लग्न लावून टाकतो. तेही एकवेळ मान्य केलं तरी ज्युलिएट निपचित पडली म्हणजे ती थेट मेलीच ! नाडी तपासणं, वैद्यांना बोलावणं वगैरे काही नाहीच. इतकं होऊन ती कबरीत गुदमरून पण मरत नाही. तिला बाहेर काढायला पाद्री येतो तेव्हा ती जिवंत असते आणि मग ती खंजीर खुपसते. पण तो आवाज ऐकून पाद्री थांबत नाही. शिपाई येतात कोणी तिला वाचवायचा प्रयत्न करत नाही. सगळंच शेक्सपियरच्या मनासारखं... वैद्यक आणि शरीरशास्त्र सुद्धा !

कथानक चांगलं असलं तरी मांडणी फारच भोंगळ आणि वरवरची झाली आहे. संवाद पण कधी फारच अनैसर्गिक बोजड तर काही वेळा घाई घाई केलेले असे आहेत. मराठी भाषांतर मूळ कृतीशी सुसंगत असल्यामुळे तेही तसंच अनैसर्गिक आहे. त्यात अनुवादकाचा दोष नाही. एकूण ह्या नाटकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी "नाव मोठं लक्षण खोटं" असा अनुभव देणारं ठरलं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet)

पुस्तक - रोमियो अँड ज्युलिएट (Romeo and Juliet) लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवादक - अनघा नाटेकर (Anagha Natekar) भाषा -...