चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala)






पुस्तक - चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala)

लेखक - उपेंद्र पुरूषोत्तम साठे (Upendra Purushottam Sathe)

भाषा मराठी (Marathi)

पाने 319

ISBN - दिलेला नाही 

मुंबईचे उपनगर असलेल्या पार्ल्यामध्ये "विजय स्टोअर्स" नावाचं प्रसिद्ध दुकान आहे. किराणा भुसार मालाचे दुकान असलं तरी त्याचबरोबर दिवाळीच्या फराळाचे पदार्थ, श्रीखंड,पुरणपोळी असे नाना खाद्यपदार्थ, अळूवडी सारखे मराठमोळे पदार्थ सुद्धा विकायला  असतात. अतिशय उच्च दर्जाचा माल ही दुकानाची खासियत. त्यामुळे इतर दुकानांपेक्षा भाव थोडा जास्त असला तरी चोखंदळ ग्राहकांची "विजय स्टोअर्स"ला पसंती राहिली आहे. 1933 साली सुरू झालेलं हे दुकान पारल्यातलं नामवंत ठिकाण, ओळखीची खूण झालेलं आहे. भाऊ साठे हे या दुकानाचे संस्थापक. त्यांचे धाकटे बंधू अण्णा साठे. अण्णा साठे यांचा सांभाळ लहानपणापासून भाऊंनी केला. भाऊंबरोबर अण्णा दुकानात काम करू लागले आणि पुढे दुकानाची धुरा त्यांनी सांभाळली. त्या अण्णा साठे अर्थात उपेंद्र पुरुषोत्तम साठे यांचे हे आत्मचरित्र आहे.

कोकणातल्या दरिद्री ब्राह्मण कुटुंबातुन मुंबईला येऊन स्वतःच्या परिस्थितीला हातभार लावणाऱ्या असंख्यांपैकी एक हे साठे बंधू. पण सर्वसामान्य मराठी-ब्राह्मणी वृत्तीशी फारकत घेत हे व्यवसायात उतरले; पण प्रामाणिकपणा, भरपूर कष्ट करण्याची तयारी, शिस्त हे मराठी-ब्राह्मणी सद्गुण न विसरता. यातून यांचा व्यवसाय सुरु झाला, वाढला आणि स्वतःची वेगळी छाप उमटवून गेला. त्यांचा हा प्रवास वाचणं खूप रोचक आहे. बरंच काही शिकवून जाणारं आहे.

विजय स्टोअर्स मध्ये मालाची गुणवत्ता राखली जायची. तरीही कोणाची तक्रार आली तर दुर्लक्ष न करता त्यात लक्ष घालून कुठे चूक तर होत नाहीये ना ना तर होत नाहीये ना याची तपासणी केली जायची. त्याचा हा प्रसंग वाचा

धंदा म्हटला की चढणं उतरणं आलंच. किराणामालासारख्या हजारो वस्तूंची खरेदी-विक्री करायचा धंद्यात एखाद्या व्यापाऱ्याकडून, पुरवठादारांकडून फसवणूक व्हायचे प्रसंग सुद्धा आले. तर काही वेळा "नामदार" दुकानदार म्हणून बाजारात मानही मिळत गेला. तसे बरेच किस्से पुस्तकात आहेत वाचायला खूप मजा येते. चहा बाजारातला हा एक किस्सा.

दुकानाची विक्री वाढती रहावी, गिऱ्हाईक सतत जोडलं जात राहावं यासाठी आगळे वेगळे उपक्रम सुद्धा साठे राबवत राहिल. दुकानाची दिनदर्शिका हा त्यावेळी नवीनच असलेला नवीनच नवीनच असलेला एक साधा पण परिणामकारक उपक्रम त्याची गंमत गंमत त्याची गंमत वाचा.


इतकं सगळं चांगलं चालत असूनही कामगारांच्या डोक्यात कली शिरला. युनियन करून साठ्यांना नाडायचा प्रयत्न  केला. त्यामुळे दुकान बंद करावे लागले. दुकान बंद झालं. काही कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या. जवळच्या नातेवाईकांची निधने झाली. असा वाईट काळ सुद्धा त्यांनी अनुभवला त्यांच्या मुलाने काही वर्षांनी दुकान पुन्हा सुरू सुरू दुकान पुन्हा सुरू केलं. ही सगळी रोलर कोस्टर राइड वाचताना आपणही समरस होतो.

लहानपणापासून घडलेले घरगुती कौटुंबिक प्रसंग हा आत्मचरित्राचा अविभाज्य भागच. पुस्तकात असे भाग पुष्कळ आहे. तो वैयक्तिक असला तरी त्यावेळची कुटुंब पद्धती लोकांची विचार करण्याची पद्धत आणि आणि व्यवसाय चालवणाऱ्या कुटुंबात मागे काय घडतं हे सांगणारे आहेत लेखकाची शैली सुद्धा अतिशय लालित्यपूर्ण आहे त्यामुळे वाचताना "मला काय करायचं यांच्या घरच्या गोष्टींचं" असं अजिबात वाटायला लावत नाहीत. साठे कुटुंबावरची कादंबरी वाचतो आहोत असं वाटतं.

आपल्या भावावर व्यवहार ज्ञानाचे आणि खऱ्या श्रीमंतीचे संस्कार करण्याची हा भाऊं साठ्यांची ही वेगळी पद्धत.




कोंड्याचा मांडा करून खातानाही आपल्याकडे जे आहे त्यातलंच, जमेल तितकं इतरांना देण्याची सवय या भावंडांनी जपली. परिस्थिती सुधारल्यावर, हाती पैसा खेळू लागल्यावर साठ्यांनी इतर विस्तारित कुटुंबीयांना, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस मदत केली. सर्व समाजाचं देणं मानलं. गरजूंना, संस्थांना मदत केली. संस्थात्मक व रचनात्मक कार्याला स्वतःच्या अनुभवाचा फायदा करून दिला. हे सगळे प्रसंग सुद्धा, गाजावाजा न करता, अहंकार न बाळगता निवेदनाच्या ओघात सांगितले आहेत. त्यातून या भावंडांना आणि निवेदनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. लोकमान्य सेवा संघाच्या एका उपक्रमाला मदत करण्याबद्दल चा हा किस्सा आणि पु.लंकडून झालेलं कौतुक

साठ्यांच्या मदतीचं प्रत्येकवेळी कौतुकच झालं असं नाही. पदरमोड करून वर अपमान पदरी पडला असे सुद्धा प्रसंग घडले. साठे आपल्या मूळ गावाच्या -सुसेरी -च्या भल्यासाठी पुढाकार घेऊन, स्वतःच्या पैशातून शाळा बांधत होते. पण त्याची परतफेड मात्र वेगळीच झाली. कूळ कायद्याचा गैरवापर करून, ब्राह्मण म्हणून उलट बदनामी करायचा प्रयत्न झाला. 

महाराष्ट्रातल्या जातीयतेचा नंतर सुद्धा एकदा फटका बसला. गांधीहत्येनंतर ब्राह्मणविरोधी दंगली महाराष्ट्रभर पेटल्या होत्या. अनेक हत्या झाल्या, ब्राह्मणांची घरं जाळली गेली, कुटुंब देशोधडीला लागली. हा इतिहास नव्या पिढीपासून लपवलेला आहे. याच दंगलीत विजय स्टोअर्स लुटायला जमाव आला होता. अण्णांनी धीराने त्याला तोंड दिले. तो प्रसंग वाचण्यासारखा आहे.

असे सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक ताणेबाणे आपल्यासमोर उलगडणारं हे पुस्तक आहे. वरची पानं  वाचताना तुमच्या लक्षात आले असेलच की लेखकाची शैली सुद्धा आधी रसाळ आहे. शब्दांचे खेळ करणारी आहे. त्यामुळे वाचण्यात वेगळीच गंमत येते.

यशस्वी मराठी व्यापाऱ्याचं, कुटुंबवत्सल सद्गृहस्थाचं, सामाजिक भान सांभाळणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं आत्मकथन तुम्हाला नक्की आवडेल.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------




पारखा (Parkha)

 



पुस्तक : पारखा (Parkha)
लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा : कन्नड (Kannad) 
अनुवाद : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
पाने : २७६
ISBN : 978-818-498-9014


कर्नाटकातल्या एका लहान खेड्यात, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासच्या काळात घडणारी ही कथा आहे. शेती आणि पशुपालनावर आधारलेली अर्थव्यवस्था असणारं, आधुनिकतेचा स्पर्श न झालेलं हे खेडं आहे. इथे लोक गायी फक्त पाळत नाहीत तर भारतीय संस्कृतीला अपेक्षित असा गोमाता म्हणून तिचा आदर करतात. गोपूजेचं महत्त्व आणि भक्ती हा गावाचा स्वभाव आहे. अश्या या गावात काळींगा गौडा हा गावचा पाटील, मोठा गोठा असणारा आणि गायींचा प्रेमाने सांभाळ करणारा आहे. हे प्रेम कसं आहे हे या प्रसंगातून कळेल.
गावातल्या काही वादवादीमुळे गावात चरणाऱ्या गुरांसाठी कोंडवाडा तयार करावा लागला होता. त्यात आलेल्या गायीची कशी काळजी घेतो पहा.






या काळींगाचा नातू - त्याचं नाव पण काळींगाच - तो अमेरिकेत शिकून येतो. आपलं गाव, समाज सोडून दुसरीकडे गेलं की नव्या जाणिवा तयार होतात. नवे विचार समजतात. आपले आचारविचार जुनाट वाटू शकतात. काळींगाचं तसंच होतं. अश्यावेळी गावकरीच पुढे येऊन त्यांच्या घरचं श्राद्धपक्ष करतात. खेडोपाडी दिसणारी परस्पर सहकार्याची भावना आणि काळींगाबरोबर संस्कृती संघर्षाची ठिणगी इथे आपल्याला दिसते.








पुढे काळींगाची अमेरिकन बायको भारतात आल्यावर हा संघर्ष धारधार होतो. "गाय ही देवता" आणि "गाय हा उपयुक्त पशू" हा तात्त्विक वाद घडू लागतो. काळींगाबरोबर वाढलेला गावच्या पुरोहितांचा मुलगा - वेंकट -त्याचा मित्र. वेंकट शाळा शिकलेला आणि पौरोहित्य शिकलेला असल्यामुळे तो या दोघांशी बोलतो, समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक संवाद हा वादातच परिवर्तित होत राहतो. हे वाद-संवाद या कादंबरी चा आत्मा आहे. त्याचं हे एक उदाहरण. 




प्रसंगी वेंकट शास्त्रार्थ सांगतो आणि आपल्या मंत्रांमध्ये गायींबद्दल काय म्हटलं आहे हे सांगतो. गोपूजेची जाणीव आपल्या संस्कृतीत किती पुरातन काळापासून रुजली आहे त्याचंच हे द्योतक आहे.






पुढे काळींगाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की ज्यामुळे; गाय म्हणजे फक्त उपयुक्त पशू का त्याहून अधिक काही; पाश्चात्त्य विचार का भारतीय विचार याची घुसळण आता त्याच्या मनात शिरू लागते.

वाचताना मला असं वाटलं; की गाय आपल्याला दूध देते म्हणून आपण गायीला देव मानतो. पण मग म्हशीला का नाही ? मांसाहार सुद्धा पूर्ण भारतात वर्ज्य नाही. वेदांमध्ये सुद्धा पशुबळीचे उल्लेख आहेत. केवळ "कमी दर्जाची उपासना पद्धती" म्हणून तिची बोळवण करता येईल का ?  पुस्तकातला काळींगा आजोबा म्हणतो, "वासरांनी पिऊन जेवढं दूध राहील तेवढंच आपण घ्यायचं. आपण गाईंना भरपूर खायला घातल्यामुळे जेवढं जास्तीचं दूध मिळेल तेवढंच आपलं." हा विचार खूप भूतदयावादी वाटतो. पण खायला प्यायला घालून गायींन जास्त दूध द्यायला लावणं हा सुद्ध्य त्यांच्यावर अत्याचारच नाही का? माणसाला हवं त्याच वाळूबरोबर गायीचा संग घडवून आणणं हे सुद्धा परंपरेतच आहे. यात कुठे आहे गायीच्या भावनांचा विचार ? इथे भारतीय समाज सुद्धा गाईला उपयुक्त पशूच समजतो आहे ना ? दुसरीकडे असं दिसतं की पाश्चात्त्य देशांमध्ये दूध, मांसासाठी जनावरांची पैदास करणे, शेतीच्या रसायनीकरणातून उत्पादन वाढवणे आणि बेसुमार जंगलतोड यातून झालेला फायदा हळूहळू या पृथीलाच नाशाच्या उंबरठ्यावर नेट आहे. मग असं वाटतं की कोणे एकेकाळी आपल्या समाजाची अवस्था सुद्धा आजच्या पाश्च्यात्त्य समाजासारखीच असेल. निसर्गाचा उपभोग घेता घेता हळूहळू आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं असेल की निसर्गाकडून कितपत "घेतलं" आणि कितपत "परत दिलं" की आपला स्वार्थ आणि निसर्ग याचा समतोल राहतो. आणि त्यातून आपल्या संस्कृतीतल्या प्रथा परंपरा  यमनियम बनले असतील. आता त्यातलं विज्ञान. अर्थशास्त्र, दूरदृष्टी आपण विसरलोय आणि राहिलेत फक्त पोथ्यांमधले नियम. त्यामुळे ऐहिक जगण्याच्या प्रश्नांना या भावनिक नियमांची उत्तरे थिटी पडतायत. 
पुन्हा एकदा निसर्गाचा जास्तीत जास्त वापर, त्याचे दुष्परिणाम, त्यातून आलेली समज आणि मग एक समंजस संस्कृती या प्रवासावर पाश्च्यात्य देशांच्या साथिने आपण निघालो आहोत  !!

दोन संस्कृती मधला हा सनातन वाद अश्या भावनिक पातळीवरून सुरेख पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे वैचारिक वाद कंटाळवाणा होत नाही. कुठल्याही एका बाजूने न लिहिता समतोल लिहिलं आहे त्यामुळे पुस्तक प्रचारकी थाटाचं होत नाही. आपण सुद्धा वाचताना प्रत्येक पात्राशी समरस होऊन त्याचा त्याचा विचार समजून घेत पुढे जातो. पुढे काय होतंय याची उत्सुकता वाढवत राहते. आपणसुद्धा साधकबाधक विचार करू लागतो.

अनुवादाबद्दल प्रश्नच नाही. भैरप्पांची पुस्तके आणि उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद हे समीकरणच आहे. ते तितकंच सार्थ आहे. हा अनुवादसुद्धा त्या यशस्वी मालिकेतलं एक सुंदर पुष्प आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती 



अनुवादिकेची पुस्तकात दिलेली माहिती 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

पथेर पांचाली (Pather Panchali)


पुस्तक : पथेर पांचाली (Pather Panchali)

लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तकाची भाषा : बंगाली (Bengali) 

अनुवाद : प्रसाद ठाकूर  (Prasad Thakur)

पाने : ३२८

ISBN : 9789353173890

पथेर पांचाली ही अतिशय लोकप्रिय कादंबरी आहे. याच कादंबरीवरचा सत्यजित रे यांचा चित्रपट सुद्धा खूप गाजलेला आहे . बंगाली भाषेतली कादंबरी प्रसाद ठाकुर यांनी मराठीत अनुवादीत केली आहे


लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 

अनुवादकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

ब्रिटिश कालीन बंगालमधल्या एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका गरीब ब्राह्मण परिवारातील व्यक्तींची ही गोष्ट आहे. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं(दुर्गा व अपू) ही मुख्य पात्रं आणि आजूबाजूचे शेजारी, गावकरी इत्यादी सहपात्रं असं पुस्तकाचं स्वरूप आहे. गरिबीमुळे कशी परिस्थिती अशी भोगावी लागते; कोंड्याचा मांडा करुन राहावं लागतं याचे प्रसंग पुस्तकात आहेत. एकच एक सलग कथानकापेक्षा छोट्या छोट्या घटना एकेका गोष्टीप्रमाणे लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला नाव आहे. ही त्यावेळच्या कादंबऱ्यांमध्ये आढळणारी नेहमीची पद्धत आहे.

लहान मुले म्हटले  की आपल्या या कल्पनाशक्तीने खेळ खेळणार, लहान मुलांमध्ये रमणार, खोड्या काढणार, काहीतरी चुकीची कामे करून गोंधळ घालणार, तर कधी मारामारी करणार. कादंबरीतल्या बऱ्याचशा गोष्टी या प्रकारच्या आहे आहेत. लहान भावंडांच्या खोड्या, खेळ, भेटणारे मित्र असे प्रसंग यात आहेत. त्याचं एक उदाहरण कवड्यांच्या खेळाचं.




गावातली पोरं म्हटल्यावर त्यांचे खेळ पण दगड, माती, पाणी , झाडंझुडपं यांच्याशी जोडलेले. निसर्गत मुक्त हिंडत आपली लहर होईल तसा आनंद घेत जगायचं. त्यातला एक प्रसंग. 




गरीब माणसाला शारीरिक कष्ट करावे लागतातच आणि मानसिक कष्ट व अपमानही झेलावे लागतात. या अपमानाचे काही प्रसंग पुस्तकात आहेत. दुर्गावर आलेल्या चोरीच्या आळाचा हा प्रसंग.






दुर्दैव सुद्धा कुटुंबाच्या पाचवीला पुजलेलं आहे. त्यामुळे कुटुंबियांचे अकाली मृत्यु धंद्यात अपयश  हे सुद्धा कादंबरीत आहे. नवऱ्याच्या मागे मुलं वाढवताना सर्वजायला मोलकरीण व्हावं लागलं.





अशी अतिशय करूण कादंबरी आहे.  पण "अपू"  सोडला तर इतर पात्रांच्या मनात डोकावायचा खूप प्रयत्न केलेला दिसत नाही केलं. त्यांच्याशी आपण समरस होत नाही. त्यामुळे दुर्दैवाचा दशावतारांची जंत्री असं कादंबरीचे स्वरूप वाटतं .

खेड्यातील जीवन, तिथलं दैन्य, शेतकऱ्यांची वाईट अवस्था इत्यादीवर दिवस आधारित "गोदान", "बारोमास"; लहान मुलाच्या भावजीवनावर आधारित  "पाडस"; "श्यामची आई" ही पुस्तकं प्रचंड प्रभावशाली आहेत . त्यामुळे ही कादंबरी गाजायचं कारण काय हे मला कळलं नाही. कदाचित, शंभर वर्षांपूर्वी पुराणातल्या चमत्कारांच्या, देवादिकांच्या, राजे महाराजांच्या कथा साहित्यातून प्रगट होत असतील; तेव्हा खरं जीवन जसं आहे तसं समोर ठेवणारी कादंबरी असल्यामुळे आवडली असेल. आता अशा प्रकारचे साहित्य खूप लिहिलं जातं. त्यामुळे या कादंबरीचा वेगळेपणा जाणवत नाही. शहर असो वा गाव, आता जगण्याची क्लिष्टता देखील खूप वाढली आहे. त्यामुळे ही कादंबरी फार सपक, सरधोपट वाटते.

अनुवाद मात्र छान झाला आहे. कुठेही बोजडपणा, कृत्रिमपणा आलेला नाही. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही .


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Mother Teresa (मदर टेरेसा)

 




पुस्तक - Mother Teresa (मदर टेरेसा)
लेखक - Meg Greene (मेग ग्रीन)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १५२
ISBN - 978-81-8495-357-2

मदर टेरेसा हे नाव ऐकलं नाही ही असा माणूस विरळाच. गरिबांची सेवा आणि ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी आपला आयुष्य स्वार्थी केलेल्या मदर टेरेसा यांचं हे चरित्र आहे. मदर टेरेसा यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर त्यांना मिळालेल्या ख्रिश्चन संत पदापर्यंतचा पूर्ण कालावधी यात समाविष्ट आहे. त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या निर्णयावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती यांची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळते. अजिबात पाल्हाळ न लावता; कादंबरी प्रमाणे प्रसंगांचं सादरीकरण असं न करता एखाद्या अधिकृत रिपोर्ट प्रमाणे प्रसंग आणि तथ्य सांगितलेली आहेत. पुस्तकात लेखकाने स्वतःची मते मांडलेली नाहीत. त्यामुळे बरेवाईट प्रसंग आणि मदर टेरेसा यांच्यावर झालेल्या टीका व स्तुती अशा दोन्ही बाजू समतोल प्रमाणात पुस्तकात आल्या आहेत.




वयाच्या सोळा सतराव्या वर्षी मदर टेरेसा यांनी स्वतःचं जीवन ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी वाहून घ्यायचं ठरवलं. भारतातून आलेल्या धर्मप्रसारकांचं सेवाकार्य त्यांनी ऐकलं होतं त्यामुळे त्या गटालाच जाऊन मिळायचं त्यांनी ठरवलं आणि त्या भारतात आल्या. सुरुवातीला कलकत्त्यातल्या एका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या. त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल पुस्तकातला हा मजकूर. 


पुढे कलकत्त्यातली गरिबी बघून आपलं काम गरिबांची सेवा करावी, तेच जीझसचं रूप आहे असं त्यांच्या मनाने घेतलं. एका रेल्वे प्रवासात त्यांना जणू साक्षात्कार झाला की हेच आपलं जीवनध्येय आहे. तो प्रसंग पुस्तकात आहे. त्यांनी स्वतःचा नवीन पंथ काढायचं ठरवलं जो गरीबांच्या सेवेसाठी समर्पित असेल, स्वतः गरीब राहून गरिबांची सेवा करेल. परंतु ख्रिश्चन धर्म हा अतिशय संघटित आहे. नन पासून पोपपर्यंत व्यवस्थापनाची उतरंड असणार आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक धार्मिक अधिकार्‍यांपासून पोपर्यंत सर्वांची परवानगी घ्यावी लागली. पुढे आयुष्यातही त्यांच्या पंथाच्या विस्तारासाठी धर्मसत्तेची परवानगी मिळवणे, त्यांची मदत मिळवणे हा भाग पुस्तकात वारंवार येतो. त्यातून ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मप्रसारासाठी चाललेल्या अतिशय शिस्तबद्ध जागतिक योजनेची कल्पना आपल्याला येते. त्यातल्या सुरुवातीच्या परवानगी मिळवण्याच्या अनुभवाबद्दल हे थोडंसं.





नवीन पंथ सुरू केल्यावर झोपडपट्टीत जाऊन मुलांना शिकवणं त्यांनी सुरू केलं. आधी उघड्यावरच आणि मग एखाद दुसऱ्या खोपटात शाळा सुरू झाली. आजूबाजूला आढळणाऱ्या विकलांग मरणप्राय व्यक्तींना आसरा देऊन मरताना त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणणे त्यांना प्रेमाने निरोप देणे हा प्रकार त्यांनी सुरू केला. हळूहळू यांना साथीदार जोगीणी मिळत गेल्या. प्रसंगी विरोधही झाला. उदा. मारणाऱ्या लोकांसाठी "निर्मल हृदय" त्यांनी काली मंदिराच्या बाजूला स्थापन केलं. त्यामुळे देवाच्या ठिकाणी अशी संस्था नको म्हणत विरोध झाला. कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केल्यावर आपल्या विभागात असलं काम नको म्हणून काही वेळा लोकांचा विरोध झाला. पण त्यांनी आपलं काम निष्ठेने सुरू ठेवलं.

गरीब राहणं ही त्यांच्या पंथाची प्रतिज्ञा होती. त्या गरिबीचा आणि लोकांकडून मिळणाऱ्या मदतीचा अनुभव त्यांना रोज येत होता त्यातलेच हे काही प्रसंग.


त्यांच्या पंथाची पुरुष शाखा सुद्धा पुढे त्यांनी सुरू केली. चर्चच्या नियमाप्रमाणे महिला असल्यामुळे त्या स्वतः याचे नेतृत्व करू शकत नव्हत्या. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक त्यांना करावी लागली. पण सर्व अधिकार स्वतःकडे ठेवायची त्यांची वृत्ती असल्यामुळे त्या नव्या प्रमुखाबरोबर अनेकदा त्यांचे वाद झाले. शेवटी त्या प्रमुखाने हे पद सोडलं आणि तेरेसाना साजेशी भूमिका असणाऱ्या माणसाची या पदी नियुक्ती झाली.

आपला पंथ जगभर पसरवण्याची परवानगी पुढे चर्चने त्यांना दिली. यातून मदर तेरेसा यांचे देशोदेशी दौरे सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम, मरणासन्न व्यक्तींसाठी आश्रम, नैसर्गिक संकटामध्ये मदत कार्य इ. सुरू झाले. देशोदेशींचे लोक त्यांना येऊन मिळाले. काही जमेल तशी मदत करू लागले. सामान्य लोकांपासून राष्ट्रप्रमुखांपर्यंत आणि उद्योगपतींपर्यंत त्यांची ऊठ-बस वाढू लागली. मोठमोठ्या देणग्या मिळू लागल्या या सगळ्या घटनांचा उहापोह पुस्तकात आहे. त्यांच्या कामाबद्दल विविध देशांच्या प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रम झाले, वृत्तपत्रांत लेख लिहून आले. त्यातून त्यांची प्रसिद्धी अजून वाढत गेली. त्यातले काही महत्त्वाचे टप्पे प्रसंग, मुलाखती इ. त्याबद्दल या पुस्तकात लिहिले आहे




जसजशी मदर टेरेसा यांच्या कामाची व्याप्ती आणि प्रसिद्धी वाढत होती तसतशी त्यांच्या कामाची निर्भिड चिकित्सा होऊ लागली. वाजवी आणि कठोर टीकाही होऊ लागली. मदर टेरेसा मरणातून व्यक्तींसाठी आश्रम चालवतात पण प्रत्यक्षात तिथे लोकांवर उपचार करण्याऐवजी मरताना म्हणायच्या प्रार्थनाच म्हटल्या जातात. त्यांना लोकांना वाचवायचं नव्हतं तर मरताना केवळ प्रेमाचा हात द्यायचा होता; अशी टीका होऊ लागली. गरिबांसाठी केलेल्या कामातही गरिबी हटवण्याचे उपाय करण्याऐवजी केवळ गरिबांना तात्पुरती मदत देत राहणं हेच त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे त्यांचं प्रेम गरिबांवर नसून; गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीतून होणारा धर्मप्रसार आहे असं अनेकांचं मत झालं. त्यात फक्त ख्रिश्चनेतर भारतीयच नव्हते तर युरोपियन, अमेरिकन, ख्रिस्ती लोकही होते. गर्भपात व संततिनियमन याबद्दलही त्यांची मतं सनातनी ख्रिस्ती व्यक्तीची होती. गर्भपाताला विरोध होता. संततिनियमन नैसर्गिक पद्धतीने करावं हे त्यांनी उघडपणे सतत सांगितलं. आणि हे आपल्या कामाचं मुख्य ध्येय आहे असं त्या म्हणत. त्यामुळे बेसुमार लोकसंख्यावाढ गरीबीला कारणीभूत होत असली तरी त्याच्याशी त्यांना घेणंदेणं नव्हतं. कारण ख्रिश्चन धर्मात बसत नव्हतं. त्यांच्या पंथा साठी काम करणाऱ्या व्यक्तींना गरिबीत राहण्याची आज्ञा होती. प्रत्यक्ष पैसा मिळेलअसं काम करण्याची मनाई होती. पण राजकारण्यांकडून, उद्योगपतींकडून देणग्या घ्यायला मात्र त्या तयार होत्या.  देणग्या घेताना तो माणूस कसा आहे; त्याने वाममार्गाने पैसा मिळवला आहे की काय हे बघण्याची त्यांची तयारी नव्हती. उलट काळे धंदे करणार्‍या व्यक्तींकडून आपण पैसा घेतला आणि तो देवाच्या कामासाठी वापरला तर आपोआपच त्यालाही याचं अध्यात्मिक पुण्य मिळेल असा त्यांचा विचार होता. त्यामुळे मिळालेल्या देणग्या आणि त्यांची व्यवस्था कशी लावली याबद्दल बहुतेक वेळा त्यांनी उत्तर देणं टाळलं किंवा देव सगळे बघून घेईल अशा पद्धतीची उत्तरे दिली. आयुष्यात अगदी गलितगात्र होईपर्यंत आपलं पद सोडून उत्तराधिकारी नेमायची त्यांनी तयारी दाखकली नाही. या आणि अशा बऱ्याच टीकां वरचा सविस्तर लेख पुस्तकात आहे. त्यांच्याबद्दल टीकात्मक लेख, पुस्तके प्रसिद्ध झाली, कार्यक्रम, सिनेमा किंवा फिल्म तयार झाल्या हे सगळे लेखकाने मांडला आहे.




हा सगळा वाद संवेदनशील आहे आणि व्यक्ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे लेखकाने जागोजागी पुस्तकांचे, वेबसाइटचे, रिपोर्टचे संदर्भ दिलेले आहेत. यातून पुस्तकाची विश्वासार्हता वाढते. 

पुस्तकातून श्रद्धाळू, समर्पित आणि दुराग्रही अशा मदर टेरेसा यांच्या बऱ्या-वाईट बाजूची माहिती आपल्याला होते. बाबा अमटेंसारख्या समाजसेवकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्या कुष्ठरोग्यांना हात लावायला सर्वसामान्य लोक तयार होत नाही अशा कुष्ठरोग्यांना त्यांनी प्रेमाने जवळ केलं, आपल्या पायावर उभं केलं. पण संघटित धर्मशक्तीचं पाठबळ यावर टेरेसांचं नाव आणि काम जगभर पोचलं. चार पिढ्या समाजसेवेत खपणाऱ्या आमटे परिवाराचं मात्र तसं होत नाहिये.  असो. ही तुलना या विषयातल्या तज्ज्ञांकडून समजून घ्यावी; त्याबद्दल अजून खोलात जाऊन वाचावं अशी इच्छा अनेकांना वाटेल. त्यादृष्टीने सुरुवात म्हणून हे पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026)

पुस्तक - नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026) भाषा - मराठी (Marathi) संपादक - आश्लेषा महाजन आणि सायली कुलकर्णी (Ashles...